ठाणे :ठाण्यात सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांसह पालक, नोकरदारांची तारांबळ उडाली. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक होते. परंतु पावसामुळे झालेली वाहतुक कोंडी आणि दैना यामुळे विद्यार्थी, पालकांच्या उत्सुकतेवर पाणी फेरले. तर काही विद्यार्थ्यांनी पावसामुळे पहिल्या दिवशी सुट्टी घेतली.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. रस्त्यांची कामे, पाऊस आणि अपघात यामुळे मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर मार्गासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या आणि अंतर्गत मार्गांवर वाहतुक कोंडी झाली होती. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने कोंडीत भर पडली. त्यामुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. काही भागात वृक्ष कोसळून नुकसान झाले.
ठाणे शहरात जनजीवन विस्कळीत झाले. वृंदावन गृहसंकुल येथील श्रीरंग परिसर, घोडबंदरसह काही सखल ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून रहिवाशांना, वाहन चालकांना वाट काढावी लागली. राबोडी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यालगतचे वृक्षाची फांदी कोसळली. ही फांदी रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार चाकी मोटारीवर पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. कावेसर येथे एका संरक्षण भिंतीवर वृक्ष कोसळले.
घोडबंदर मार्गालगत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज प्रवाशांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने आणि अपघातामुळे कोंडीत भर पडली. घोडबंदर येथील पातलीपाडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारा ट्रक उड्डाणपूलालगत दुभाजकाला धडकला. त्यामुळे येथील वाहतुक विस्कळीत झाली. त्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावल्याने कापूराबावडी ते मानपाडा येथे वाहतुक कोंडी झाली. मुंबई नाशिक महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
भिवंडी भागातही माणकोली, महामार्ग परिसरात पाणी साचल्याने कोंडी झाली होती. तसेच येथील रहिवाशांचे देखील हाल झाले.