कल्याण – रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील सखल भागात पाणी तुंबले आहे. याच बरोबर शहापूर, मुरबाड तालुक्यातील भातसा, काळू, रायता, मुरबाडी, कानवी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उल्हास नदीचे पाणी कल्याण रेतीबंदर खाडी किनारा भागात शिरल्याने परिसर जलमय झाला आहे.
उल्हास खोरे, कसारा घाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने या घाटाच्या पायथ्याशी असलेला भूभाग जलमय झाला आहे. भातसा नदी, रायता नदी, काळू नदी परिसरातील गावांना महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काळू नदीला महापूर असल्याने मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी रविवारी दुपारी नदी परिसरातील गावांची पाहणी केली. आपत्कालीन पथके या भागात तैनात करण्यात आली आहेत. रायता, टिटवाळा खडवली नदीवरील पुलांंवरून पाणी वाहत असल्याने हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या नद्यांच्या परिसरातील गावांचा परिसराशी संपर्क तुटला आहे. भातसा नदीचे पाणी खडवली परिसरातील गावांमध्ये पसरल्याने परिसरातील गावांना सतकर्ततेचा इशारा देण्यात आला आहे.
डोंबिवलीतील कोपर, आयरे, गणेशनगर, कल्याणमधील आंबिवली, शहाड, कोळीवाडा, अटाळी, टिटवाळा परिसरातील सखल भागात उल्हास नदी, खाडीचे पाणी घुसले आहे. कल्याण मधील रेतीबंदर भागातील तबेले चालकांनी आयत्यावेळी धावपळ नको म्हणून तबेल्यातील म्हशी गोविंदवाडी वळण रस्त्यावर आणण्याची तयारी सुरू केली आहे. दुर्गाडी किल्ला भागात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्यावर देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपली वाहने योग्य ठिकाणी उभ्या करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.
शहापूर तालुक्यातील कानवी, भातसा, मुरबाड तालुक्यातील संगम येथील काळू नदी दुथडी वाहत आहे. संगम कासगाव येथील शिवमंदिराच्या पायथ्याला पाणी लागले आहे. काळू नदीचे पाणी सकाळी पुलावरून संगमकडे जाणाऱ्या पुलावरून वाहत होते. नद्यांचे पाणी परिसरात पसरल्याने शहापूर, मुरबाड परिसरातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका, मलंग रस्ता, शिळफाटा रस्त्याचा काही भाग, काटई बदलापूर रस्त्यावर सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. खडेगोळवली, विठ्ठलवाडी भागातून वाहणारे नाले दुथडी वाहत आहेत. वालधुनी परिसरातील रहिवाशांंच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे या भागातील काही रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली पालिकेची आपत्कालीन पथके शहराच्या विविध भागात तुंबलेले पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.