ठाणे : ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक गुरूवारी दिवसभर सुरळीत दिसून आली असली तरी, या निर्णयानुसार, मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सोनाळे गावापासून पोलिसांनी अवजड वाहतूक रोखून धरल्याने मोठी कोंडी झाली. यामुळे दहा ते बारा किमी अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी घोडबंदर मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. तसेच या मार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती उभी राहली असून या नागरिकांची वाहने याच मार्गे वाहतूक करतात. घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची कामे सुरू आहेत. या कामांमुळे रस्ता अरुंद झाला असतानाच, त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कोंडी होत आहे. तसेच अवजड वाहतूकीला वेळा ठरवून दिलेल्या असतानाही त्या व्यतिरीक्त वेळेत अवजड वाहतूक सुरू असते.

अवेळी सुरू असलेल्या अवजड वाहतूकीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून या कोंडीमुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलने केली होती. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते. दरम्यान रात्री बारा वाजेपूर्वी वाहने सोडणाऱ्या आणि वेळेच बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष व ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले होते. या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी रात्री १२ ते पहाटे ६ यावेळेत अवजड वाहनांना वाहतूकीची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसुचना काढली होती. तसेच या आदेशाची पोलिसांनी अंमलबजावणीही सुरू केली असून यामुळे ठाणे आणि घोडबंदर भागातील वाहतूक दिवसभर सुरळीत असल्याचे चित्र दिसून आले.

अवजड बंदीचा फटका ग्रामीण भागाला

मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली भागापासून ठाणे ग्रामीण पोलिसांची हद्द सुरू होते. ठाणे वाहतूक पोलिसांनी बासुरी येथेच अवजड वाहतूक बंदीचा बॅनर लावला आहे. या निर्णयानुसार ठाणे वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येत नव्हता. यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली, सोनाळे येथूनच अवजड वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यात खासगी वाहनेही अडकून पडली होती. वाहने पुढे सरकत नसल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते. यामुळे दहा ते बारा किमी अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.

आम्ही मुरबाड ते मुंबई असा गेली ३० वर्षे आमच्या वाहनाने प्रवास करतो. त्यावेळी वाहन जुने होते आणि रस्ते खराब होते. तरीही प्रवासाला अडीच तास लागत होते. आता रस्ते रुंद झाले आणि वाहनेची चांगल्या दर्जाची आहेत. तरीही आम्हाला साडेतीन तास किंवा त्याहून अधिक वेळ प्रवासाला लागतो. गुरूवारी मुंबई-नाशिक महामार्गावर सोनाळे येथे अवजड वाहतूक रोखून धरण्यात आल्याने त्यात आमच्यासह इतर खासगी वाहने अडकून पडली होती. वाहने जागेवरच उभी होती. शंभर मीटरचे अंतर पार करण्यासाठी तासभराचा अवधी लागला. स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले, अशी माहिती ज्ञानेश्वरी कामत यांनी सांगितले.