ठाणे: वेळेत जेवण दिले नाही म्हणून एकावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओंकार भोसले, अभि पाटील आणि त्यांच्या एका साथीदारावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ओंकार भोसले हा अभिलेखावरील गुन्हेगार असून तो तडीपार होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आझादनगर येथे सागर गोल्डन हील टाॅप नावाचे हाॅटेल आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ओंकार भोसले, अभि पाटील आणि त्यांचा एक सहकारी या हाॅटेलमध्ये गेला. जेवण वेळेत मिळाले नाही म्हणून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करू लागले. त्यामुळे हाॅटेलचे मालक संतोष शेट्टी यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघे तेथून निघून गेले.

हेही वाचा… कल्याणमधील साडे चार हजार झाडांवर संक्रांत; २५ वर्ष राखलेल्या जंगलाची कत्तल होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध

काही वेळाने पुन्हा ते हाॅटेलमध्ये आले. त्यावेळी ओंकार याच्या हातात कोयता होता. त्याने हाॅटेलमधील निलेश नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ओंकार हा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी कोयता घेऊन आला. त्यावेळी हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्या तिघांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरूवात केली. त्यामुळे तिघेही दुचाकीवरून पळून गेले. या घटनेनंतर हाॅटेल मालकाने तात्काळ कासारवडवली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना संपर्क साधला.

पोलीस घटनास्थळी आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. हल्लेखोर ओंकार हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो तडीपार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotel worker was attacked by a chopper for not serving food on time in thane dvr