डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील खोणी पलावा, कासा बेला पलावा भागात दररोज विविध प्रकारचे गुन्हे घडत असताना, बुधवारी दोन लहान मुले पलावा कासा बेला गोल्डमधील क्रेस्टा सोसायटी आवारात व्हाॅलीबाॅल खेळत होती. खेळताना व्हाॅलीबाॅल बाजुच्या सोसायटी आवारात उडाला. ही मुले व्हाॅलीबाॅल आणण्यासाठी गेली तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे यांनी दोन्ही लहान मुलांना दटावले. त्यांचे हात रूमालाने बांधून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी या मुलांच्या पालकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
पाऊस कमी झाल्याने आता लहान मुले संध्याकाळच्या वेळेत सोसायटी आवारात, सार्वजनिक रस्त्यावर, मोकळ्या मैदानांमध्ये खेळताना दिसत आहेत. बुधवारी संध्याकाळी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा वसाहतीमधील कासा बेला गोल्ड भागातील क्रेस्टा इमारतीच्या आवारातील उद्यानात लहान मुले व्हाॅलीबाॅल खेळत होती. खेळत असताना एका मुलाने मारलेल्या जोरदार बुक्क्याने व्हाॅलीबाॅल बाजुच्या इमारतीच्या आवारात उडाला.
हा उडालेला व्हाॅलीबाॅल सुरक्षा रक्षकाने चुकून आल्याने मुलांना परत करणे अपेक्षित होते. याऊलट दुसऱ्या इमारतीचा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे यांनी सोसायटीच्या आवारात आलेल्या दोन लहान मुलांना तुम्ही बाॅल आमच्या सोसायटीच्या आवारात का उडवला. तुमच्या बाॅलमुळे आमच्या सोसायटी आवारातील वाहनांचे नुकसान झाले आहे. सदस्य मला याप्रकरणी ओरडा करतील. परत असा प्रकार होता कामा नये, असे बोलत सुरक्षा खंदारे याने पहिले एका मुलाला जवळ घेतले आणि त्याला परत असा बाॅल परत आला तर तुम्हाला त्या ठिकाणी बांधून ठेवीन अशी दटावणी केली. त्यानंतर दुसऱ्या मुलाला सुरक्षा रक्षक खंदारे यांनी जवळ घेतले. दोघांचे हात रुमालाने बांधले. आणि त्यांना दटावणीच्या स्वरात मारहाण करत पुन्हा बाॅल आमच्या सोसायटीच्या आवारात येणार नाही ना, असे प्रश्न केले.
या मुलांनीही सुरक्षा रक्षकाने आम्हाला मारहाण केल्याचा दावा केला आहे. मुलांनी सुरक्षा रक्षकाच्या तावडीतून सुटका करून घेतली. आणि ती घरी आली, त्यांनी घडला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. या दोन्ही मुलांचे पालक तात्काळ बाजुच्या सोसायटीच्या आवारात गेले. तेथे सुरक्षा राजेंद्र खंदारे यांना, मुलांकडून चुकून बाॅल उडून आला म्हणून तुम्ही मुलांचे हात का बांधले आणि त्यांना का मारहाण केली असे प्रश्न केले.
यावेळी सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी खंदारे यांनी पालकांसोबत अरेरावीची भाषा केली. मी कोणाला घाबरत नाही. तुम्ही काहीही करा. मला काहीही होणार नाही, अशी त्याची उर्मट भाषा होती. सुरक्षा रक्षक खंदारे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ही माहिती सोसायटी अध्यक्ष योगेश पाटील यांना देण्यात आली.
अखेर सोसायटीने याप्रकरणी सुरक्षा रक्षक खंदारे यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष पाटील यांनी या प्रकरणाची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी राजेंद्र खंदारे यांना अधिकच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना नोटिस देण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.