डोंबिवली – डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्दीत आयरे, कोपर आणि भोपर भागात भूमाफियांनी उभारलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची अशी एकूण २१ बेकायदा बांधकामे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने सोमवारी भरपावसात पोलीस बंदोबस्तात भुईसपाट केली. या कारवाईने आयरे भागातील राजकीय मंडळी, भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मागील तीन महिन्याच्या कालावधीत भूमाफियांनी आपल्या प्रभागात कारवाई होत नाही म्हणून पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन रात्रीच्या वेळेत, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी बेकायदा चाळी, व्यापारी गाळे बांधणीसाठी माती, दगडांची भरणी, जोत्यांची उभारणी करून ठेवली होती. मुसळधार पाऊस सुरू झाल्यावर ग प्रभागाचे अधिकारी प्रभागात येणार नाहीत, असा विचार करून भूमाफियांनी बेकायदा चाळी, गाळे उभारणीची कामे पूर्ण केली.

गणेशोत्सवाच्या काळात ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी प्रभागात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची उभारणी, आयरे तलावाजवळ विसर्जनाची तयारी करण्यासाठी ग प्रभागात फेरफटका मारला. त्यांना नव्याने उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळी, गाळ्यांची माहिती मिळाली. ही सर्व बांधकामे भूमाफियांनी पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारण्यात आली आहेत. ही सर्व बांधकामे अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तोडून टाकण्याचे नियोजन साहाय्यक आयुक्त पवार यांनी केले.

रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी तात्काळ पालिकेच्या मागणीवरून पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला. सोमवारी सकाळी साहाय्यक आयुक्त भारत पवार, पोलीस बळ आणि तोडकाम पथक घेऊन कोपर पूर्व भागातील दोन व्यापारी गाळे आणि बेकायदा चाळ उभारणीसाठी बांधलेली जोत्यांची बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केली. कोपर रेल्वे स्थानकाजवळ चाळीलगत बेकायदा निवासी खोली उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. याशिवाय कोपर आणि भोपर गावांच्या हद्दीवर माती, दगडांची भरणी करून नऊ खोल्यांची चाळ आणि सात जोत्यांची बांधकामे पूर्ण करण्यात आली होती. आयरे तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नव्याने उभारलेल्या व्यापारी गाळ्याचे बांधकाम ही सर्व बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

कारवाई सुरू असताना एकही भूमाफिया कारवाईत अडथळा आणण्यासाठी पुढे आला नाही. ग प्रभागात आक्रमक पध्दतीने कारवाई सुरू झाल्याने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे. भरपावसात ही बेकायदा बांधकामे तोडून टाकण्यात आली. या कारवाईने काही स्थानिक राजकीय मंडळी अस्वस्थ झाली आहेत. आगामी पालिका निवडणुकींसाठी लागणारा दौलतजादा या बेकायदा बांधकामांच्या माध्यमातून उभारण्याचा त्यांचा इरादा होता, पण तो साहाय्यक आयुक्त पवार यांनी हाणून पाडला आहे. ग प्रभाग हद्दीतील उच्च न्यायालयाने तोडण्याचे आदेश दिलेली समर्थ काॅम्पलेक्स बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे नियोजन ग प्रभागाने केले आहे. ६५ इमारतीच्या विषयावर मंत्रालयात बैठक असल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.