डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील छेद गल्लीतील सुयोग हाॅल समोरील गल्लीत आराधना या जुन्या पुननिर्माणाच्या बेकायदा इमारतीचे बांंधकाम पालिकेच्या फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी सहा महिन्यापूर्वीच विहित प्रक्रिया पूर्ण करून अनधिकृत घोषित केले आहे. हे बांधकाम निवडणूक संपताच पालिकेकडून जमीनदोस्त केले जाणार आहे.

बांधकाम सुरू असलेल्या सुयोग हाॅल गल्लीत आराधना नावाची जुनी इमारत होती. ही इमारत गेल्या वर्षी तोडण्यात आली. या इमारती समोर नऊ मीटरचा रस्ता नाही. जगदीश खेडेकर या भूमाफियाने ही इमारत उभारली असल्याचे फ प्रभाग कार्यालयातील अभिलेखावरून स्पष्ट झाले आहे.

या इमारतीला पुरेसे क्षेत्र नसल्याने भूमाफिया जगदीश खेडेकर यांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता गेल्या वर्षी या बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली. या इमारती विषयी तक्रारी प्राप्त होताच, सहा महिन्यापूर्वी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांंत जगताप यांनी आराधना या जुुन्या इमारतीच्या जागेवर बांधण्यात येत असलेल्या बेकायदा इमारतीचा बांधकामधारक खेडेकर यांना नोटिसा पाठवून इमारत बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यांनी ती फ प्रभागात दाखल केली नाहीत.

हेही वाचा : कल्याण-सीएसएमटी सकाळची १५ डबा लोकल तीन महिन्यांपासून गायब

साहाय्यक आयुक्त जगताप यांनी सहा महिन्यापूर्वीच आराधना इमारतीच्या जागी उभी राहत असलेली इमारत अनधिकृत घोषित केली. आता या इमारतीचे सात माळ्याचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. इमारत अनधिकृत घोषित केल्यानंंतर जगताप यांनी या बेकायदा इमारतीवर कारवाई का केली नाही, असे प्रश्न तक्रारदार किशोर सोहोनी यांनी उपस्थित केले आहेत.

सोहोनी यांनी या बेकायदा इमारत प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे हमीपत्र आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. तरीही पालिका हद्दीत राजरोस बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या हमीपत्राला आव्हान देत सोहोनी यांंनी याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा : २३ वर्षांच्या पाणी टंचाईच्या संघर्षाला ठाण्यातील गृहसंस्थेने दिली मात, पाण्याच्या साठवणूकीचे केले यशस्वी नियोजन

साहाय्यक आयुक्त जगताप यांनी यापूर्वी मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिर जवळील केतन दळवी यांची, खंबाळपाडा येथील अश्विनी पांंडे, धनंजय शेलार, संदीप डोके, महेश लहाने या भूमफियांंच्या बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या आहेत .

आराधना या बेकायदा इमारतीचे बांधकाम अनधिकृत घोषित केले आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच निवडणुकीनंतर हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले जाईल.

चंद्रकांंत जगताप (साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली)

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे हमीपत्र आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी उच्च न्यायालयात दिले आहे. तरीही पालिका हद्दीत जोमाने बेकायदा बांधकामे सुरू आहेत. याविषयी आपण आयुक्तांच्या हमीपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांंवर कारवाईची मागणी केली आहे.

किशोर सोहोनी (याचिकाकर्ते, डोंबिवली)