कल्याण: सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १५ डब्यांची लोकल गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. अशा प्रकारच्या दोन लोकल आहेत. यामधील एक लोकल गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याने रेल्वे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना धक्के खाण्यापेक्षा सुखाने प्रवास करता येत होता. या लोकलला महिलांंसाठी दोन स्वतंत्र डबे, प्रथम श्रेणीचे वाढीव डबे होते. त्यामुळे नियमित लोकलवर येणारा भार या लोकलमुळे कमी होत होता. या लोकलला महिलांसाठी वाढीव डबे असल्याने महिला प्रवाशांना धक्केबुक्के न खाता लोकलमध्ये शिरता येत होते. या १५ डब्यांच्या लोकलमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे दरम्यानच्या फलाटांवरील प्रवाशांंना नऊ आणि १२ डब्याच्या लोकलपेक्षा दिलासा मिळत होता.
अशाप्रकारच्या दोन लोकल सकाळच्या दरम्यान होत्या. यामधील कल्याणहून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी लोकल गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रवाशांसाठी महत्वाची असणारी ही लोकल का बंद आहे याचे कोणतेही कारण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिले जात नाही. ही लोकल सुरू करावी म्हणून रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत, त्यांना कोणी दाद देत नाही.
कल्याण ते ठाणे दरम्यान रेल्वे प्रवाशांचे गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून अधिकाधिक प्रवाशांच्या सोयीच्या लोकल सोडणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन उलट महत्वाच्या लोकल बंद ठेऊन प्रवाशांची गैरसोय करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अशा लोकलची आता गरज आहे, असे प्रवासी सांगतात.
हेही वाचा : डोंबिवलीत घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक
उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय परिचलन अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांनी १५ डब्याच्या लोकलची दोन वर्षातून एकदा देखभाल, दुरुस्ती करावी लागते. या कामासाठी कमीतकमी ४० दिवस लागतात. त्यामुळे अशा लोकल प्रवासी सेवेत येण्यास उशीर होतो. यावर अरगडे यांनी अलीकडे लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना एवढे दिवस देखभालीसाठी लावून रेल्वे प्रशासन नक्की काय साध्य करते, असे प्रश्न अरगडे यांनी अधिकाऱ्यांंसमोर उपस्थित केले. डोंबिवली ते मुंब्रा दरम्यानचे बहुतांशी रेल्वे प्रवासी मृत्यू हे गर्दीमुळे होत आहेत. याची जाणीव ठेऊन रेल्वे प्रशासनाने १५ डबा लोकल लवकर सुरू करावी, अशी मागणी अध्यक्षा अरगडे यांनी केली आहे.
सकाळच्या वेळेत कल्याणहून सीएसएमटीला जाणारी १५ डब्यांची लोकल प्रवाशांना सोयीची होती. प्रवासी गर्दीचे विभाजन आणि नियमित लोकलवरील भार यामुळे कमी होत होता. परंतु, ही महत्वाची लोकल देखभालीच्या नावाखाली रेल्वेने तीन महिन्यांपासून बंद करून ठेवली आहे. ती लोकल तात्काळ सुरू करावी.
लता अरगडे (अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ)