डोंबिवली – विविध गुन्हे दाखल असलेला आणि पोलीस उपायुक्तांनी ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून तडिपार केलेला एका कोयता टोळींचा गुंड मानपाडा पोलिसांनी एमआयडीसी फेज एक भागातून अटक केला. शीळ रस्त्यावरील टाटा पॉवर नाका देशमुख होम्स परिसरात राहणारा हा गुंड पोलिसांची नजर चुकवून पुन्हा डोंबिवलीत दाखल झाला होता. तो हातात कोयता घेऊन दहशत पसरवित होता.
लखन राजू पवार असे या गुंडाचे नाव आहे. तो कल्याण शीळ रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील देशमुख होम्सच्या बाजुला असलेल्या गांधीनगर पिसवली भागातील रहिवासी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने आणि त्याच्यावर अनेक गु्न्हे दाखल असल्याने पोलीस उपायुक्तांनी मागील वर्षी त्याला ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून हद्दपार केला आहे. लखनची पिसवली, टाटा पॉवर नाका भागात खूप दहशत होती. त्याच्या त्रासाला नागरिक, व्यावसायिक, व्यापारी कंटाळले होते. रात्रीच्या वेळेत एकट्या असलेल्या पादचाऱ्याला तो आपल्या साथीदारांच्या साहाय्याने धमकावत होता.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळाली की डोंबिवली एमआयडीसी फेज एक भागात एका कंपनी जवळ एक इसम हातात कोयता घेऊन दहशत पसरवित आहे. या इसमाकडून पादचारी किंवा अन्य कोणावर हल्ला केला जाण्याची शक्यता माहितगाराने दिली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी हवालदार ठाकुर, बोराडे आणि साळवी यांना पाचारण केले. त्यांना तातडीने एमआयडीसी फेज एक भागात दहशत पसरवित असलेला इसम फिरत असलेल्या भागात जाण्यास सांगितले.
पोलीस पथक एमआयडीसी फेज एकमध्ये गेल्यावर त्यांना दूरवरून एक इसम पियुश कंपनी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर हातात कोयता घेऊन बेभान होऊन रस्त्याने चाललेल्या पादचारी लोकांच्या अंंगावर, रिक्षा, दुचाकी स्वारांवर कोयता घेऊन धावत असल्याचे आढळले. हाच तो इसम असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पथकाने त्याला पकडण्याची तयारी केली. आपण तुला पकडण्यास आलो आहोत असे अजिबात जाणून न देता इसमाला बेसावध ठेऊन पोलीस पथकाने इसमाला चारही बाजुने पादचारी म्हणून घेरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या हातामधील कोयता पहिले पोलिसांनी काढुन घेतला. आपण पकडले गेलो आहोत याची जाणीव झाल्यावर इसम पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण पोलिसांनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते.
त्याला पोलीस वाहनात बसविल्यावर त्याचे नाव विचारल्यावर त्याने लखन राजू पवार असल्याचे सांगितले. आपण पिसवली गांधीनगर टाटा पाॅवर नाका देशमुख होम्स भागात राहत असल्याचे सांगितले. पथकाने त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी तो तडिपार गुंड असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्यावर शस्त्र प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली. त्याची रवानगी तडिपारीच्या क्षेत्रात केली. काही दिवसापूर्वी खंबाळपाडा भागातून पोलिसांनी दहशत पसरविणाऱ्या तडिपार गुंडाला अटक केली होती.