डोंबिवली – मागील तीस वर्षाच्या काळात दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आपली साहित्य, संस्कृती, परंपरा जतन करण्याचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम वैशिष्ट्य पूर्ण असतात. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील साने गुरूंजीच्या अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ शल्यविशारद डाॅ. अक्षय वसंतराव कुळकर्णी यांच्या शंख वादनाचा कार्यक्रम श्री गणेश मंदिर संस्थानने आयोजित केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले डाॅ. अक्षय कुळकर्णी सोमवारी सकाळी बापूसाहेब फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर संस्थानने आयोजित केलेल्या युवा भक्ती आणि शक्ति दिन कार्यक्रमात सकाळी साडे सात वाजता विविध लय, सुरातील शंख वादन करून नागरिकांची मने जिंकणार आहेत. पुणे येथील नितीन महाजन यांच्या केशव प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विश्वविक्रमी शंख वादन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. सलग ३० सेकंद विविध लय, सूर, सुरावटींमध्ये डाॅ. अक्षय कुळकर्णी शंख वादन करतात.
शंख वादन प्रेरणा
डाॅ. अक्षय कुळकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यात झाले. शालेय जीवनापासून डाॅ. कुळकर्णी यांना लष्करी सेवेची आवड होती. इयत्ता पाचवीमध्ये सातार येथील सैनिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. राज्यात ते आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एनडीएच्या बारावी परीक्षेत ते देशात २२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एसएसबीमध्ये ते सर्वाेच्च स्थानी होते. या उच्च गुणवत्तेमुळे डाॅ. अक्षय कुळकर्णी यांची एअर फोर्समध्ये निवड झाली.
बालपणापासून डाॅ. अक्षय यांना दम्याचा विकार होता. एअर फोर्समधील वैद्यकीय तपासणीच्यावेळी दमा विकारावरून डाॅ. अक्षय यांचा अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांची एअर फोर्समधील संधी हुकली. यावेळी डाॅ. अक्षय यांच्या धुळे येथील मार्गदर्शकांनी डाॅ. अक्षय यांना नैसर्गिक पध्दतीने दमा विकार घालविण्यासाठी नित्यनेमाने शंख वादन करण्याचा सल्ला दिला. यामुळे हदय, फुप्फुसे मजबूत होतील आणि दम्याचा त्रास होणार नाही, असे सुचविले. तेव्हापासून डाॅ. अक्षय कुळकर्णी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून नित्यनेमाने आपल्या पुजेतील शंख फुंकतात. हे शंख वादन करताना त्यांनी मिळालेल्या विविध तंत्रज्ञानातील माहितीमधून शंख वादन कशा, किती सुरावटी आणि कसे करायचे याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचा शंख वादनात हातखंडा आहे.
एअर फोर्समधील संधी हुकल्याने नाऊमेद न होता डाॅ. अक्षय कुळकर्णी यांनी डोंबिवलीतील त्यांचे मामा आदिवासींच्या आरोग्य, शिक्षणासाठी कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत डाॅ. सुधीर कुळकर्णी यांच्या डोंबिवलीतील घरी राहून मुंबईतील ग्रॅन्ट मेडिकल महाविद्यालयातून एम. बी. बी. एस., एम. एस., डी. एन. बी. असे शिक्षण पूर्ण केले. अनेक वर्ष डोंबिवलीत वास्तव्य केल्याने त्यांना डोंबिवलीकर म्हणून ओळखले जाते. डाॅ. सुधीर कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील प्रताप धर्मार्थ रुग्णालयात डाॅ. अक्षय यांनी रुग्णसेवा केली. धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून ते सेवेत आहेत. संघाच्या सेवाभारती विभागात ते सक्रिय आहेत. त्यांना गिर्यारोहणाची आवड आहे.