कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीचे रेल्वे तिकीट खिडकीजवळून अपहरण झाले. या मुलीचा कल्याण रेल्वे स्थानक परिसर, नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती आढळून आली नाही. याप्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान एक प्रवासी आपल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठी आला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी जाण्यापूर्वी प्रवाशाने त्याच्या मुलीला पिशवी जवळ उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर तो तिकीट काढण्यासाठी गेला. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग होती. त्यामुळे त्यांना परत येण्यास उशीर झाला. तिकीट काढून आल्यानंतर मुलीच्या वडिलांना सामानाच्या पिशव्यांजवळ मुलगी आढळून आली नाही.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

त्यांनी तात्काळ परिसरात शोध घेतला. त्यांना ती कोठेच आढळून आली नाही. कुटुंबीय, नातेवाईकांना विचारणा केली. तेथेही ती आढळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane at kalyan railway station minor girl kidnapped css