ठाणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने मतदार मतदानासाठी बाहेर उतरला असतानाच मध्य रेल्वेने मतदानाच्या दिवशी रेल्वेची वाहतूक सुट्टीच्या वेळापत्रकाने सुरू केली आहे. पूर्वी मुंबईत राहणारे अनेक रहिवासी ठाणे किंवा त्यापल्याड राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे मतदान मुंबई तसेच उपनगरात असते. परंतु मध्य रेल्वेचे वेळापत्रक रविवारच्या दिवसाचे असल्याने या मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झाले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरीही काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत असते. तसेच गेल्या काही वर्षांपासून मुंबई तसेच उपनगरात राहणारा मतदार पुनर्विकास तसेच राहण्यास स्वस्त पर्याय म्हणून ठाणेपल्याड राहण्यासाठी गेला आहे. यातील अनेकांचे मतदान हे त्यांच्या पूर्वीच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे मतदार देखील मतदानाच्या दिवशी बाहेर पडू लागले आहेत.

हेही वाचा : “मोदींना जितक्या शिव्या द्याल..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, विधानसभेच्या जागावाटपाबाबत म्हणाले..

अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना मतदान केल्यानंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागते. असे असतानाच मध्य रेल्वेने सोमवारी सुट्टीच्या म्हणजेच रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू केली आहे. त्याचा परिणाम मतदारांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक होत असल्याने रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा करत या मतदारांना स्टेशन परिसरात थांबावे लागत आहे.