ठाणे : मुंब्रा येथील एका गृहसंकुलाच्या आवारात बेकायदा उभारलेल्या प्रवेशद्वारासंदर्भात ठाणे महापालिकेकडे तक्रार केल्याच्या करणावरून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची आठ वर्षांपूर्वी तीन जणांनी हत्या केली होती. ठाणे न्यायालयाने याप्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अब्दुल मजीद रशीद काझी (४२), मोहम्मद उस्मान बशीर अहमद शेख (४५) आणि सिद्धीक काझी (२१) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. मुंब्रा येथे २०१६ मध्ये एका गृहसंकुलाच्या आवारात बेकायदेशीरपणे प्रवेशद्वार उभारण्यात आला होता. या प्रवेशद्वाराविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते साजिद अन्सारी यांनी ठाणे महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे अब्दुल काझी, त्याचा मुलगा सिद्धीक आणि मोहम्मद उस्मान बशीर अहमद शेख यांनी साजिद यांना चाकू, लाकडाच्या साहाय्याने बेदम मारहाण केली होती. यात साजिद यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : शहापूरमध्ये भात खरेदीत सुमारे दीड कोटींचा घोटाळा, आमदाराच्या पुतण्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

तर याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. न्यायाधीश वसुधा भोसले यांनी तिघांना मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. विनीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली. तर, तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक एम. डी. जाधव यांनी काम पाहिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane life imprisonment for three in rti activists murder case css