शहापूर : शेतकऱ्यांच्या खोट्या व बोगस चलन पावत्या बनवून तब्बल पाच हजार क्विंटल भात खरेदीत सुमारे दीड कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून अजित पवार गटाचे शहापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या व साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा यांच्यासह सहा जणांवर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या किमान आधारभुत योजने अंतर्गत करण्यात आलेल्या भात खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून खर्डी केंद्रातील कोट्यवधींच्या घोटाळ्यानंतर आता साकडबाव केंद्रातील कोट्यवधींचा घोटाळा समोर आला आहे. तालुक्यातील साकडबाव केंद्रांतर्गत झालेल्या १३ हजार ८९२ क्विंटल भात खरेदीपैकी भरडाई साठी आठ हजार ७७१ क्विंटल भात उचलण्यात आला. उर्वरित पाच हजार १२० क्विंटल भात शिल्लक असणे अपेक्षित असताना तो भात आढळून आला नाही. यामुळे एक कोटी साठ लाखाचा घोटाळा झाल्याचे तपासणी दरम्यान उघडकीस आले.
हेही वाचा : कल्याणमध्ये विकसित भारत योजनेच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन
अजित पवार गटाचे शहापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या व साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा यांनी आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापुरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवून तब्बल पाच हजार क्विंटल भात खरेदीत सुमारे दीड कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शहापुरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : कल्याण : केडीएमटीच्या कार्यशाळेला आग, आगीत दोन बस खाक
याबाबत साकडबाव आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष हरेश दरोडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझा या भात खरेदी घोटाळ्यात संबंध नसल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे केंद्रप्रमुख जयराम सोगीर यांनी भात खरेदीत कोणताही गैरव्यवहार करणार नाही व केल्यास सर्वस्वी जबाबदारी माझी असेल असे हमीपत्र दिल्याचे हरेश दरोडा यांनी सांगितले. तसेच महामंडळ बरोबर सोगीर यांचाच करार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.