ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका शाळेमध्ये स्ट्राँग रुम तयार करून येथे मतदान यंत्रणा ठेवण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे येथील स्ट्राँग रुममध्ये आहे. येथील विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कासारवडवली भागात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये असे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. असे असतानाही बुधवारी एमएमआरडीएच्या ठेकेदाराने रस्ते खोदकाम करताना महावितरणची विद्युत वाहिनी तोडली.

ही वाहिनी स्ट्राँग रुमला विद्युत पुरवठा करणारी पर्यायी विद्युत वाहिनी होती. सुदैवाने स्ट्राँग रुममधील विद्युत पुरवठा सुरळीत होता. या गंभीर प्रकारानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या ठेकेदारानेही अशाचप्रकारे विद्युत वाहिनी तोडली होती. असे असतानाही पुन्हा विद्युत वाहिनी तोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात आरटीईसाठी ११ हजार अर्ज दाखल, अर्ज भरण्याची ३१ मे अंतिम तारीख

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मुख्य रस्ता सेवा रस्त्यामध्ये सामाविष्ट करण्याचे कार्य सुरू आहे. कासारवडवली येथील कावेसर परिसरातील या कामाचा ठेका देव इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीला देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खोदकाम करताना येथील सेवा रस्त्याखालून गेलेली विद्युत वाहिनी तोडली. या कामामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही विद्युत वाहिनी स्ट्राँग रुमला विद्युत पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था होती. स्ट्राँग रुमला विद्युत पुरवठा करणारी मुख्य वाहिनी सुस्थितीत असल्याने स्ट्राँग रुमच्या विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला नाही. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, देव इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच भागात ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराने रस्त्याचे खोदकाम करताना एक विद्युत वाहिनी तोडली होती. महावितरण कंपनीनने आदेश देऊनही ठेकेदारांकडून खोदकामे सुरूच आहेत.