ठाणे : कोणी दाढी वाढविली म्हणजे दिघे साहेब होत नसतो. दिघे साहेब हे व्यक्तीमत्त्व एकदाच होऊन गेले. त्यांची ड्युप्लिकेटगिरी करून कोणाला दिघे साहेब होता येणार नाही. त्यासाठी तशी कामे करावी लागतात. अशी टीका शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी केली. राजन विचारे यांनी त्यांच्या इन्टाग्राम या समाजमाध्यमावर मुलाखतीचा काही भाग प्रसारित केला आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी टीका केली आहे.

शिवसेना आणि ठाणे शहर हे वेगळे समीकरण आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी तळागाळातील अनेक शिवसैनिकांना घडविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे त्यापैकी आहेत. या दोघांनाही ठाण्यात आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर काही वर्षांनी ठाण्यातील शिवसेनेची सुत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आली होती. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. तर खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. राजन विचारे यांना उद्धव ठाकरे यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर दुसरीकडे महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही. असे असले तरी राजन विचारे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर शहरात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरू केल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांचा वापरही करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली

काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी खासदार राजन विचारे यांची मुलाखात घेतली होती. या मुलाखतीमध्ये आदेश बांदेकर यांनी एक प्रश्न विचारला होता. ‘काहीजण आपण दिघे साहेबांचे खरे पट्टशिष्य आहोत असे म्हणतात नेमकी परिस्थिती काय? असे बांदेकर यांनी राजन विचारे यांना विचारले. त्यावर उत्तर देताना राजन विचारे म्हणाले की, दाढी वाढविली म्हणजे, दिघे साहेब होता येत नाही. दिघे साहेब हे व्यक्तीमत्त्व एकदाच होऊ शकते. असे व्यक्तीमत्त्व पुन्हा होऊ शकत नाही. दाढी वाढवून, चेहरे बदलून डुप्लिकेटगिरी करून, दिघे साहेब किंवा बाळासाहेब होता येत नसते. त्यासाठी तशी कामे करावी लागतात. असा टोला त्यांनी लगावला आहे.