ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलालगत उभारण्यात आलेल्या पादचारी पूलावर गर्डर उभारले जाणार आहे. या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी नाशिक येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर १८ एप्रिलला रात्री ११.५९ ते १९ एप्रिल पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत. येथील वाहने पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई नाशिक महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जातो. या मार्गावरून उरण जेएनपीटी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने वाहतूक करतात. तसेच भिवंडी, नाशिक येथून ठाणे, मुंबई, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे प्रमाण देखील अधिक आहे. हा महामार्ग अरूंद असल्याने त्याच्या रुंदीकरणाचे कार्य राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून साकेत पूल परिसरात नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूलाची उभारणी केली जात आहे. या पूलावर गर्डर उभारला जात आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी साकेत पूल परिसरात नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक बदल लागू केले आहेत.

हेही वाचा : ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प

नाशिक, भिवंडी येथून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टोलनाका येथून डावे वळण घेऊन गॅमन रोड, रेतीबंदर मार्गे वाहतूक करतील. उरण जेएनपीटी येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे, मुंबई नाशिक महामार्गाने घोडबंदर, गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना गॅमन रोड येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून डावे वळण घेऊन मानकोली नाका, वसई मार्गे वाहतूक करतील. हे वाहतूक बदल १८ एप्रिलला रात्री ११.५९ ते १९ एप्रिलला पहाटे ४ वाजेपर्यंत बदल लागू केले असतील.