टिटवाळ्यात शिवसेना-भाजपमध्ये ‘कमळ’ चिन्हावरुन वाद; शिंदे समर्थकांनी उतरविण्यास लावले पेहरावावरील कमळ चिन्ह

कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आपणास शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.

Titwala, Shiv Sena, BJP, KDMC program, party symbol, dispute
टिटवाळ्यात शिवसेना-भाजपमध्ये ‘कमळ’ चिन्हावरुन वाद; शिंदे समर्थकांनी उतरविण्यास लावले पेहरावावरील कमळ चिन्ह

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पेहरावावर लावलेले पक्षाचे कमळ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने काढण्यास सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने आपणास शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजप महिला पदाधिकाऱ्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना, स्थानिक पातळीवर मात्र शिंदे समर्थकांनी पालिकेच्या कार्यक्रमात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी साडीवर लावलेले कमळ चिन्ह काढण्यास लावल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगामी पालिका निवडणुकीची ही चिन्हे असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा… यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा

अ प्रभागातर्फे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे बुधवारी कार्यालयात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेना, भाजप व इतर पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांनी निमंत्रित केले होते. भाजपच्या टिटवाळा मोहने विभागाच्या अध्यक्षा मनीषा केळकर आपल्या कार्यकर्त्यांसह अधिक संख्येने उपस्थित होत्या. प्रत्येक महिलेने आपल्या साडीवर पक्षाचे चिन्ह कमळ लावले होते.

हेही वाचा… ठाण्यात करोना उपचारासाठी आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था; गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

कार्यक्रमास सुरूवात होत असताना मुख्यमंत्री शिंदे समर्थक शिवसेनेचे वडवली विभागाचे माजी नगरसेवक दुर्याधन पाटील तेथे कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी शिवसेनेचे चिन्ह, गमछा घातला नव्हता. कार्यक्रम भाजपमय असल्याचे लक्षात येताच, त्यांनी पालिकेचा कार्यक्रम असल्याने येथे पक्षाचे चिन्ह लावून कार्यकर्ते कसे आले आहेत, असा आक्षेप घेतला. सर्व पक्षीय कार्यकर्ते येथे आले आहेत. पक्षाचे कमळ चिन्ह लावणे काही चूक नाही, असे भाजपच्या केळकर पाटील यांना सांगत होत्या. पण ते कमळ चिन्ह काढण्यासाठी आग्रही होते. पाटील आणि केळकर यांच्यात बोलाचाली वाढली. अखेर माजी नगरसेवक पाटील यांनी आपणास शिवीगाळ केली अशी तक्रार केळकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली. कार्यक्रमात वितुष्ट नको म्हणून आपण कमळ चिन्ह पेहरावावरुन काढले. हा आमचा, पक्षाचा अपमान होता. हा विषय आम्ही वरिष्ठांना कळविला आहे, असे केळकर यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, माजी सभापती रेखा चौधरी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम ठिकाणी निदर्शने केली.

हेही वाचा… डोंबिवलीत प्रवाशाला मारणाऱ्या रिक्षा चालकावर ‘आरटीओ’कडून होणार कारवाई

माजी नगरसेवक दुर्याधन पाटील यांनी मात्र केळकर यांचे आरोप फेटाळून लावले. पालिकेचा कार्यक्रम होता. त्यामुळे तेथे कोणत्याही पक्षाचे चिन्ह लावून कोणी मिरवू नये म्हणून आपण भाजप पदाधिकाऱ्यांना कमळ चिन्ह काढण्यास सांगितले. आपण त्यांना कोणतेही अपशब्द वापरले नाहीत. फक्त आपली बदनामी करण्याचा हा उद्देश आहे, असे स्पष्टीकरण माजी नगरसेवक दुर्याधन पाटील यांनी दिले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 17:51 IST
Next Story
यंदा ठाणे जिल्ह्यात पाणी कपात नाही; बारवी धरणात मुबलक पाणी साठा
Exit mobile version