scorecardresearch

ठाण्यात करोना उपचारासाठी आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था; गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे.

corona test
करोना चाचण्या (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षाबरोबरच आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. शहरामध्ये गेल्या १२ दिवसांत करोनामुळे पाचजणांचा मृत्यु झाला आहे. या रुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्थानक, मॉल याठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश पालिका आयुक्त कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर पिसवलीतील तरुणाचा बलात्कार

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरामध्ये सद्यस्थितीत २५२ सक्रीय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यु झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्युची संख्या वाढू लागल्याने शहराची आरोग्य चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त -१ संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश बारोट, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, उप वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता हमरजकर, डॉ. प्रशिता क्षीरसागर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राणी शिंदे, डॉ. मिलिंद उबाळे हे उपस्थित होते. शहरात आतापर्यंत पाचजणांचा मृत्यु झाला आहे. त्यांचा मृत्यु वयोवृद्ध, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, इतर गंभीर सहव्याधी यांच्यासह करोना लागण या कारणांमुळे झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असले तरी त्यांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्यात यावे, अशा सुचना आयुक्त बांगर यांनी केल्या आहेत. करोना सदृश लक्षणे असतील तर नागरिकांनी आजार अंगावर काढू नये. तसेच, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सगळ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करून रुग्ण संख्येचा अभ्यास करणे हे करोनाच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. चाचण्या अधिक केल्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, करोनाबाबतच्या ‘चाचणी, विलगीकरण, उपचार’ या प्रोटोकॉलप्रमाणे अधिकाधिक रुग्ण विलगीकरणात ठेवणे व उपचार करणे आवश्यक ठरते. त्यामुळे, चाचणी केंद्रे एकही दिवस बंद ठेवू नयेत. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्थानक, मॉल या ठिकाणी चाचणीची व्यवस्था तत्काळ केली जावी, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. प्राणवायु साठा, चाचणीच्या किट्सची पुरेशी उपलब्धता, औषधांचा पुरवठा यांच्याबद्दल काटेकोरपणे दक्ष राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>Video: “गेल्या ३५ दिवसांत तर सगळ्या मर्यादा पार…”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्वीट; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत थेट मुख्यमंत्र्यांचा केला उल्लेख!

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करोना रुग्णासाठी राखीव असलेल्या विशेष कक्षात २० खाटांची व्यवस्था आहे. त्यातील पाच खाटा अतिदक्षता विभागातील आहे. परंतु रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याने आणखी २५ खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय आयुक्त बांगर यांनी घेतला आहे. या कक्षामध्ये करोना काळात नेमण्यात आलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांची सेवा उपलब्ध द्यावी. करोनाबाधित रुग्ण व्यवस्थापनात या कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमपणे वापर होईल याची दक्षता घ्यावी अशा सुचना बांगर यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर, रुग्ण संख्या आणि खाजगी रुग्णालयामधील करोना रुग्ण यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 16:47 IST

संबंधित बातम्या