scorecardresearch

डोंबिवलीत प्रवाशाला मारणाऱ्या रिक्षा चालकावर ‘आरटीओ’कडून होणार कारवाई

डोंबिवली येथील पूर्व भागातील इंदिरा चौकात मंगळवारी रात्रीच्या वेळेत एका प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

thane RTO आरटीओ
डोंबिवलीत प्रवाशाला मारणाऱ्या रिक्षा चालकावर ‘आरटीओ’कडून होणार कारवाई

डोंबिवली येथील पूर्व भागातील इंदिरा चौकात मंगळवारी रात्रीच्या वेळेत एका प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. या रिक्षा चालकावर फौजदारी कारवाई बरोबर उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.
प्रवाशांशी सौजन्याने वागा असे रिक्षा चालकांना वारंवार सांगुनही रिक्षा चालक ऐकत नसल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुन्हे दाखल होणाऱ्या, तक्रारी येणाऱ्या रिक्षा चालकांचे परवाने, अनुज्ञप्ती काही महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीत दोन दिवसापूर्वी रात्री कल्याण पूर्वेतील पिसवली येथील रहिवासी गणेश तांबे यांना ठाकुर्लीत खंबाळपाडा भोईरवाडी भागात राहणाऱ्या सुनील गोपाळ राठोड या रिक्षा चालकाने भाडे दराच्या कारणावरुन हाताच्या बुक्क्यांनी, बांबूच्या काठीने मारहाण केली होती. हा सगळा प्रकार इंदिरा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर पिसवलीतील तरुणाचा बलात्कार

गणेश तांबे यांना इंदिरा चौकातून पिसवली येथे रिक्षेने जायचे होते. रिक्षी चालक राठोड यांना त्यांनी भाड्या विषयी विचारले. त्यांनी सांगितलेले भाडे वाढीव असल्याचे तांबे म्हणाले. त्याचा राग राठोडला आला. त्यांनी तांबे यांना मारहाण केली.प्रवासी तांबे यांनी याप्रकरणी रिक्षा चालका विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही चित्रिकरण तपासून, इतर रिक्षा चालकांशी चर्चा करुन खंबाळपाडा भोईरवाडी मधून सुनील राठोड या रिक्षा चालकाला अटक केली होती. प्रवाशाला रिक्षा चालकाने मारहाण केल्याने कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांनी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात पत्र देऊन रिक्षा चालक राठोड याच्या विरुध्द दाखल झालेला प्राथमिक माहिती अहवाल, तपासात उघड झालेली माहिती देणारे पत्र लिहिले आहे. पोलिसांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी यांच्याकडे गेल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करुन राठोड यांचा रिक्षा परवाना, त्याच्या अनुज्ञप्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे, असे साळवी यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवलीत रिक्षा चालकांकडून भाडे नाकारणे, वाढीव भाडे मागणे, प्रवाशांनी हुज्जत घालणे प्रकार वाढल्याने प्रवासी चालकांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पालिका हद्दीत अनेक रिक्ष संघटना आहेत. मग या संघटनांचा रिक्षा चालकांना धाक राहिला नाही का, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

“रामनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक सुनील राठोड यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची अनुज्ञप्ती, परवाना रद्द करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे. पुन्हा कोणत्याही रिक्षा चालकाने असा गैरप्रकार इतर प्रवाशाशी करू नये असा संदेश या कारवाईतून देण्याचा उद्देश आहे.”- विनोद साळवी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 16:11 IST

संबंधित बातम्या