ठाणे – ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रविवारी ई-ट्रॅक्टरची नोंदणी करण्यात आली असून, देशातील ही पहिली नोंदणी असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. त्यामुळे ठाणे शहराने पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे हे उपस्थित होते.
नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ऑटोनेक्स्ट या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई- ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. रविवारी या ट्रॅक्टरचे पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पार पडला. या कंपनीच्या ई – ट्रॅक्टर खरेदीवर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान मिळणार आहे.
ई-ट्रॅक्टर हा प्रामुख्याने शेतीतील कामासाठी वापरला जाणार आहे. एक एकर नांगरणी करण्यासाठी डिझेल ट्रॅक्टरला १२०० ते १५०० रुपये इतका खर्च येतो. परंतू, ई- ट्रॅक्टरला केवळ ३०० रुपये खर्च येतो. त्यामुळे दुरुस्ती देखभाल खर्चातील बचती बरोबरच दैनंदिन वापरामध्ये देखील ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशिर ठरु शकतो, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
ई-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पर्यावरणपूरक आणि खर्चात बचत करणारा ई-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ई-ट्रॅक्टरच्या पहिल्या अधिकृत नोंदणी दरम्यान ते बोलत होते. २०३० पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये २० ते ३० टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत, असे शासनाचे धोरण आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने ई-वाहनांसाठी टोल माफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना आखली आहे. याचा थेट लाभ ई-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी बिनव्याजी कर्जही उपलब्ध होऊ शकते. ई-ट्रॅक्टरचे देखभाल व दुरुस्तीचे खर्च पारंपरिक डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत जवळपास शून्य आहेत. याशिवाय, वापरात येणाऱ्या विजेचा खर्च डिझेलच्या तुलनेत ६० ते ७० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे आगामी काळात ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक किमयागार ठरणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.