लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या आव्हाड यांनी, ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे. त्यापूर्वी ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. ही पत्रकार परिषद आव्हाड यांनी घेतल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ठाण्यात राहुल गांधी येत आहेत, पण पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर आता परांजपे यांनी थेट आव्हाड यांचे नाव घेत त्यांच्यावर ठाण्यात काँग्रेस संपविल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांसाठी ५११ कोटीचा निधी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

आव्हाड यांनी शिवसेनेला २०१९ पर्यंत विरोध केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. तसेच दिवंगत आनंद दिघे यांचा दुस्वास केला. पण मुंब्रा येथील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारीगाव नाका येथील शाखा जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे तुटली असा आरोप देखील त्यांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघाबाबत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य समज देण्यात येईल. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे असे परांजपे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad ended congress in thane ajit pawar group spokesperson anand paranjape alleges mrj