कल्याण – कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात, तसेच शिळफाटा रस्त्याच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक दिवस हा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे पावसामुळे हा कचरा भिजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

गेल्या महिनाभरापासून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली शहर परिसरातील कचरा ठेकेदार कंपनीकडून योग्यरितीने उचलला जात नाही. लहान कचरा वाहनांमधून मोठ्या वाहनात कचरा भरताना निम्म कचरा कामगारांकडून जमिनीवर सांडला जात आहे. कचरा उचलण्याचे कोणतेही नियोजन ठेकेदार कंपनीकडे नाही. त्यामुळे कचऱ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. नागरिक गणपती दर्शनासाठी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. परंतु, त्यांना शहराच्या विविध भागात, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर कचरा आढळून येत आहे. डोंबिवली गणेशनगर भाग, बावनचाळ परिसरात नागरिकांनी मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकला आहे. या कचऱ्यातील पिशव्यांमध्ये असलेले पदार्थ खाण्यासाठी भटके श्वान याठिकाणी येतात. ते या भागातून जाणाऱ्या प्रवासी, दुचाकी स्वार, रिक्षा चालकाच्या पाठीमागे टोळीने पाठलाग करत आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागात पडणारा कचरा पालिकेने तातडीने उचलावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

एमआयडीसीच्या विविध भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पाऊस पडत असल्याने हा कचरा भिजून जात आहे. अनेक दिवस कचरा उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. एमआयडीसी भागातील अनेक कंपन्यांच्या भागात कचऱ्याचे ढीग आहेत. रात्रीच्या वेळेत या कचऱ्यापासून सर्वाधिक दुर्गंधी पसरते, अशा तक्रारी कंपन्यांमधील कामगारांनी केल्या.

शहराच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील कचरा नियमितपणे उचलला जात आहे. त्याचप्रमाणे शहराच्या परीघ क्षेत्रावरील कचराही नियमितपणे उचलण्यात यावा. अन्यथा त्या भागात नागरिक कचराभूमी तयार करतील अशी भीती पर्यावरणप्रेमी नागरिकांना आहे. कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी उघड्यावर रात्रीच्या वेळेत, दिवसा कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र शहरातील कचरा तीन पाळ्यांमध्ये नियमितपणे उचलला जात आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर फेकू नये अशा पध्दतीने नागरिकांच्या दारात जाऊन कचरा संकलन केला जात आहे, असे सांगितले.

दोन वर्षापूर्वी पालिकेने उघड्यावर कचरा फेकणारे सोसायट्यांमधील कामगार, त्या सोसायट्या, नागरिक यांना दंड ठोठावले होते. सतत ही कृती करणाऱ्या सोसायटी चालक, कामगारांवर गुन्हे दाखल केले होते. तशीच कृती आता पालिकेने सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.