कल्याण : कल्याण शहरांतर्गत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय आणि बाहेरगावहून कल्याण शहरात येणाऱ्या मालवाहू, अवजड वाहनांना शहराबाहेरून स्वतंत्र मार्ग असावा या विचारातून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वालधुनी नदी जवळील विकास आराखड्यातील समांतर रस्त्यावर उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्ते, उड्डाण पुलासाठी ६३९ कोटीचा निधी अपेक्षित आहे. यामुळे पालिकेने हा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रस्तावित वालधुनी नदी जवळील रस्ते मार्ग, उड्डाण पुलामुळे पुणे, अहमदनगर, जुन्नर, मुरबाड भागातून येणारी मालवाहू, अवजड वाहने आणि गुजरात, वापी, मुंबई, भिवंडी भागातून तर, मुरबाड, जुन्नर, नगरकडे जाणारी वाहने कल्याण शहरातील अरूंद रस्त्यावर येण्याऐवजी वालधुनी नदी जवळील प्रस्तावित उड्डाणपुल मार्गे शहरा बाहेरच्या उल्हासनगर, बदलापूर जोड रस्त्याने, दुर्गाडी किल्ला, आधारवाडी गांधारे पूल मार्गे इच्छित स्थळी जातील. आता ही वाहने दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय रस्त्याने, शहाड उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जाऊ शकतील.

हेही वाचा : VIDEO : गोष्ट असामान्यांची – गरजूंच्या पोटाची भूक शमवणाऱ्या अन्नपूर्णा उज्वला बागवाडे

या रस्त्यावरून आता कल्याण शहरांतर्गत आणि बाहेरील वाहने एकाच अरूंद रस्ता, पुलावरून वाहतूक करतात. पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे हा रस्ता कोंडीत अडकतो. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर शहर परिसराचे नागरीकरण झाले आहे. वाढत्या वस्तीमुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

तांत्रिक अहवाल

वालधुनी नदी जवळ कल्याण पूर्व-पश्चिम भाग जोडणारा २४ मीटरचा रस्ता विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. हा रस्ता कल्याण शहरातील कल्याण-मुरबाड रस्ता, उल्हासनगर, बदलापूर जोड रस्त्याला जोडणार आहे. हा रस्ता कल्याण पूर्व-पश्चिम रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलासह विकसित केला तर शहरातील, बाहेरून येणाऱ्या वाहनांची सरमिसळ थांबेल. शहरांतर्गत वाहने अंतर्गत जुन्या रस्त्यावरून वाहतूक करतील. वाहतूक सुटसुटीत होईल, असा अहवाल समंत्रक मे. टीजेपी प्रोजेक्ट यांनी पालिकेला दिला आहे. कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत हे दोन्ही रेल्वे मार्ग प्रस्तावित रस्ते मार्गात येतात. त्यामुळे या दोन्ही रेल्वे मार्गिकांवर कल्याण पूर्व, पश्चिम पोहच रस्त्यांना जोडण्यासाठी दोन उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या रेल्वे पुलांना रेल्वे प्रशासनाने प्राथमिक मंजुरी दिली आहे. अंतीम मंजुरीसाठी पालिका प्रयत्नशील आहे, असे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.

हेही वाचा : फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात हातगाड्यांचा शिरकाव

या रस्ते प्रकल्पासाठी एकूण ३८ हजार १६० चौरस मीटर जमीन लागणार आहे. यामधील २३ हजार ९५१ चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित क्षेत्रफळ हस्तांतरणीय विकास हक्कच्या (टीडीआर) माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे अहवालात म्हटले आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा म्हणून कल्याण, उल्हासनगरमधील लोकप्रतिनिधी आग्रही आहेत.

“आगामी काळातील कल्याण शहरातील वाढत्या वाहन संख्येचा विचार करून शहरातील वाहतूक सुरळीत असावी या उद्देशातून या रस्ते, उड्डाण पूल प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कडोंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation decided to construct a flyover on the road near waldhuni river css