कल्याण – कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी गरसेविका शीतल मंढारी, सहसंपर्कप्रमुख विजय जोशी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण पूर्व भागातील नागरी समस्या, विकास कामांचे प्रश्न सोडविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण कटिबध्द आहोत. आपण दिलेला शब्द पाळतो, आपण काय करू शकतो याची अखंड महाराष्ट्राला ओळख आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दलित मित्र आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव केतन रोकडे, संध्या रोकडे, स्नेहल रोकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी या पक्षाप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले. आगामी पालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल यादृष्टीने भाजपने विविध पक्ष, संघटनांमधून येणाऱ्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची मोहीम उघडली आहे. दर रविवारी घाऊक पध्दतीने कल्याण, डोंबिवली शहरातून विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी पालिकेतील त्यांच्या मागील कारकिर्दीत प्रभागात विकासाची अनेक कामे केली. स्थानिक पातळीवर त्यांचा नागरिक, स्थानिक संस्था, संघटना कार्यकर्ते यांच्याशी विकास कामे, नागरी समस्यांच्या माध्यमातून संपर्क आहे. त्यामुळे मंढारी यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपने कल्याण पूर्वेतील आपला एक नगरसेवक आगामी पालिका निवडणुकीसाठी पक्का केला आहे. त्याच बरोबर ज्येष्ठ पदाधिकारी विजय जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कल्याण पूर्वेत ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे.
कल्याण पूर्वमध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठी मतपेढी आहे. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अण्णासाहेब रोकडे यांच्या माध्यमातून कल्याण पूर्व भागात विकास कामे करणाऱ्या, नागरी समस्या सोडविणाऱ्या उमेदवारांना या मतपेढीच्या माध्यमातून उमेदवारांना निवडले जाते. रोकडे यांच्या परिवाराने रविवारी भाजपमध्ये प्रवेश करून ही मतपेढी पूर्ण ताकदीने भाजपच्या पाठीशी राहील असे भाजपला आश्वासित केले.
‘हे केवळ पक्ष प्रवेश नाहीत तर नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी, विकास कामे करण्यासाठी कल्याण पूर्व भागात उभी राहिलेली एक मोठी फळी आहे. प्रवेशकर्त्या प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतील प्रत्येक नागरी समस्या, विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,’ असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांना दिला.
दरम्यान, डोंबिवली पश्चिमेत भाजप पश्चिम मंडळाचे सचिव अनिल भोईर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. शिंदे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या फोडाफोडीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या फोडाफोडीला प्रत्युत्तर म्हणून याच भागातील शिंदे शिवसेना, मनसेचे दोन ते तीन पदाधिकारी लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे.
