कल्याण : कल्याण पूर्वेतील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. हे रस्ते सुस्थितीत करा म्हणून गेल्या महिनाभर आयुक्त, बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्यामागे लागुनही कोणीही त्याची दखल घेत नाही. त्यामुळे संतप्त झालेले कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील खड्डे पडलेल्या रस्त्यांची खड्डे स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांची दुरावस्था झालेले रस्ते, खड्ड्यांची छायाचित्रे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड आणि ऑस्कर सन्मानासाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली.

कल्याण शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहन चालकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे. प्रवाशांचे खड्ड्यांमुळे हाल होत आहेत. कल्याण पूर्वेतील खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावत असल्याने दररोज पूर्व भागात वाहतूक कोंडी होते. शालेय बस या कोंडीत अडकतात. त्यामुळे मुलांना घरी, शाळेत वेळेत पोहचणे शक्य होत नाही. कल्याण पूर्व हा कर्जत,-नेवाळी-शिळफाटा रस्त्यालगतचा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील बहुतांशी मालवाहू आणि इतर वाहने मधला मार्ग कल्याण पूर्व भागाचा वापर करतात. कल्याण पश्चिमेतील बहुतांशी वाहने कल्याण पूर्वेत येतात.

कल्याण पूर्वेतील खड्डे लवकरात लवकर भरावेत म्हणून गेल्या महिनाभरापासून माजी नगरसेवक महेश गायकवाड आयुक्त अभिनव गोयल, पालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. ही खड्ड्यांची परिस्थिती दाखविण्यासाठी आपण स्वता आयुक्त गोयल यांना कल्याण पूर्व शहराच्या विविध भागात फिरवले. त्यांना वस्तुस्थिती दाखवली. आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. आता एक महिना उलटला तरी पालिकेकडून कल्याण पूर्व भागातील रस्ते सुस्थितीत करण्याचे नाव घेतले जात नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागातील खड्ड्यांची स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालिकेची ढिसाळपणाची लक्तरे वेशीवर टांगण्याचा विचार आहे.

कल्याण पूर्व भागातील खड्डे पडलेले रस्ते, खड्डे यांची व्हिडिओ शुटिंग तीस सेकंद ते एक मिनिट या काळात महेश गायकवाड यांच्या कल्याण पूर्वेतील कार्यालयात झटपट आणून देईल त्या होतकरू तरूण, नागरिकाला तात्काळ आकर्षक बक्षिस, रोख रक्कम देऊन सन्मानित केले जाणार आहे. अशाप्रकारे जनसंपर्क कार्यालयात या खड्डे स्पर्धाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या व्हिडिओ शुटिंगच्या चित्रफिती, खड्ड्यांच्या प्रतिमा या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डसाठी, ऑस्कर सन्मानासाठी विशेष वहन विभागाने पाठविण्यात येणार आहेत. यानिमित्ताने कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार किती आदर्शवत, गतिमानतेने सुरू आहे. या पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा किती प्रामाणिकपणे आणि शहर विकासासाठी तत्परतेने काम करते हेही जगाला दाखविण्याचा या खड्डे स्पर्धाचा उद्देश आहे, असे महेश गायकवाड यांनी सांंगितले. कल्याण पूर्व भागातील रस्त्यांची दुदर्शा झाली असताना कल्याण पूर्वच्या स्थानिक भाजप आमदार याविषयी प्रशासनाला धारेवर धरत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.