कल्याण – ठाणे जिल्ह्यातील शहापूर ते डोळखांंब, किन्हवली, मुरबाड रस्त्यावरील शहापूर जवळील भातसा नदी जवळील लिबर्टी ऑईल मील समोरील मुख्य वर्दळीचा रस्ता ते सापगाव फाटा दरम्यानच्या रस्त्यावर मागील तीन वर्षांपासून खड्डे पडले आहेत.

मेमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून पडलेल्या या खड्डयांचा आकार बैलगाडी, रथाच्या चाकाप्रमाणे झाला आहे. खासदार, आमदार, वरिष्ठ शासकीय अधिकारी दररोज या रस्त्यावरून धावत असतात. तरीही कोणीही या वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्यांची, भातसा नदीवरील दुरावस्था झालेल्या पुलाची दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

या संतापाच्या भावनेला वाट दाखविण्यासाठी एका समाज माध्यमी नागरिकाने शहापूर ते भातसा नदीवरील पूल ते सापगाव फाटा दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरावस्था, या रस्त्यावर पडलेल्या भव्य आकाराच्या खड्ड्यांचे चित्र दर्शवून. त्यामध्ये महाभारतामधील कर्णाच्या रथाचे चाक रूतले आहे, अशी दृश्य प्रतिमा काढून ती समाज माध्यमांत प्रसारित केली आहे.

दररोज शहापूर लिबर्टी ऑईल मील समोरील मुख्य वर्दळीचा रस्ता ते भातसा नदी ते सापगाव फाटा दरम्यानच्या रस्त्यावर दररोज अनेक वाहने खड्ड्यात आपटून बंद पडत आहेत. वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने नेताना मोठी कसरत करावी लागते. भातसा नदीवरील पाणी तुंबलेल्या खड्ड्यात अवजड वाहन, इतर वाहन जोरात आपटून वाहन पुलाच्या भगदाडासकट नदीत पडते की काय अशी भीती अलीकडे प्रवासी, वाहन चालकांना वाटू लागली आहे.

शहापूर ते डोळखांब, किन्हवली, सरळगाव, मुरबाड हे जोड रस्ते मागील तीन ते चार वर्षात रुंदीकरण करून सीमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून इतर भागात वाहने सुसाट वेगाने धावतात.

परंतु, शहापूर शहरातून बाहेर पडल्यावर किन्हवली, लेनाडकडे जाताना लिबर्टी ऑईल मील समोरील रस्त्याची गेल्या दोन वर्षात चाळण झाली आहे. यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची तातडीने डागडुजी केली जात होती. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागील तीन ते चार वर्षाच्या काळात शहापूर ते शेणवामार्गे धसई, शहापूर ते किन्हवलीमार्गे सरळगाव, लेनाडमार्गे मुरबाड हे मुख्य वर्दळीचे रस्ते रुंदीकरण आणि सीमेंट काँक्रिटीकरणाचे बांधले. ही रस्ते बांधणी करताना बाधित शेतकऱ्यांना भरपाई दिली.

शहापूर जवळील लिबर्टी ऑईल मीलसमोरील रस्ता ते भातसा नदी उड्डाण पूल ते सापगाव फाटा आणि महावितरणच्या कांबारे उपकेंद्राजवळील नाल्यावरील गणपती विसर्जन घाटाजवळील वाकण पूलाचा शंभर ते दीडशे फुटाचा भाग रस्ता रूंदीकरणास देण्यास स्थानिक शेतकरी, जमीन मालकांचा भरपाईच्या विषयावरून विरोध आहे. मनाजोगी भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या भागातील रस्ते कामे करण्यास प्राधिकरणाला विरोध दर्शवला आहे.

तसेच हा रस्ता सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय दलबदलू असलेल्या एका ठेकेदाराकडे आहे. हा ठेकेदार ही कामे करण्यासाठी आग्रही भूमिका घेत नसल्याने या वर्दळीच्या रस्त्यावरील सीमेंट काँक्रिटीकरण रखडले असल्याची माहिती या भागातील लोकप्रतिनिधींकडून देण्यात येते. या ठेकेदारांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध आणि तो आता वजनदार राजकीय नेत्यांच्या छत्राखाली असल्याने याविषयी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही.