अंबरनाथः बदलापूर शहरात आणि वेशीवरील परिसरात गोवंशांच्या जनावरांची कत्तल होत असल्याप्रकरणी आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत सात कत्तलखाने जमिनदोस्तही करण्यात आले. मात्र या कारवाईनंतर गोवंश हत्या करणाऱ्यांना आपला मोर्चा अंबरनाथच्या वेशीवरील कल्याण तालुक्यातील गावांकडे वळवल्याची बाब समोर आली आहे. अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ गावातील गुरचरणाच्या जागेत काही गोवंश हत्येचे अवशेष सापडले आहेत. याप्रकरणी कल्याण ग्रामीणच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यात गोवंश हत्या करून अवैधरित्या गोमांस विक्री केले जात असल्याचे समोर आले होते. बदलापूर शहराच्या बदलापूर गाव परिसरात काही कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप होत होता. त्यानंतर बदलापूर शहराच्या वेशीवर अनेक गोवंश जनावरांची हत्या करून त्यांचे उरलेले अवशेष फेकल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा उपस्थित झाला होता. अशा कत्तलखान्यांवर कठोरे कारवाई केली जाईल, तर आरोपींना मोक्का लावला जाईल, असा इशाराही देण्यात आला होता.

कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अशा कत्तलखान्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत सात कत्तलखाने जमिनदोस्त करण्यात आले. तर यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही राज्यातील पहिली कारवाई ठरली. याबाबत पोलिसांचे कौतुक झाले. मात्र बदलापूर शहर परिसरात या घटनांना आळा बसला असला तरी याचे लोण आता अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर पसरल्याची चर्चा रंगली आहे.

शुक्रवारी अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या कल्याण तालुक्यातील जांभूळ गावाच्या गुरचरण परिसरात काही गोवंश जनावरांचे अवशेष सापडले आहेत. जांभूळ गावातील काळुराम वाघे यांची गाय बेपत्ता असल्याने ते शोधण्यासाठी गेले होते. त्यावेळी हे जनावरांचे अवशेष आढळले, अशी माहिती जांभुळचे सरपंच परिक्षित पिसाळ यांनी दिली आहे. याप्रकरणी आम्ही कल्याण ग्रामीण पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यांतर त्यांनी पाहणी केली असून नमुने तपासणीसाठी नेले आहे, असेही पिसाळ म्हणाले. यापूर्वीही असे काही प्रकार उघडकीस आले होते. शेजारी अंबरनाथ – बदलापुरच्या कचराभूमीवर चरण्यासाठी गेलेल्या काही गाई यापूर्वी गायब झाल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तो रस्ता पोलिसांकडून बंद

बदलापुरच्या कचराभूमीकडून जांभुळच्या गुरचरण परिसराकडे जाणारा एक रस्ता होता. त्या मार्गे चोरून लपून या परिसरात गाईंची चोरी केला जात असल्याचा स्थानिकांचा संशय होता. त्यानुसार पोलिसांनी हा चोर रस्ता अडथळे निर्माण करून तो बंद केला आहे.