लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासीय गावी निघाले आहेत. मात्र कोकण रेल्वेवर असलेला मेगा ब्लॉक आणि रेल्वे गाड्यांची सातत्याने विलंबयात्रा यामुळे मतदानासाठी वेळेवर पोहोचणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. नियमित आणि विशेष रेल्वे गाड्या किमान दोन-तीन तास उशिरा असून एलटीटी ते थिवीम विशेष गाडी तर ११ तास विलंबाने धावली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकणात मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये आज, मंगळवारी मतदान होणार असल्याने मुंबईतील कोकणवासीय गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाड्यांना गर्दी वाढली आहे. मात्र सततच्या विलंबाने प्रवासी हैराण आहेत. कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी गावी पोहोचण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एलटीटीवरून ४ मे रोजी रात्री १०.१५ वाजता सुटणारी गाडी ५ मे रोजी सकाळी ७.२४ वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास प्रचंड रखडत सुरू असल्याने थिवीम येथे रात्री ९ वाजता पोहोचली. ५ मे रोजीची सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या १ तास १० मिनिटे, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ३२ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ५३ मिनिटे, एलटीटी ते थिवीम १ तास २६ मिनिटे उशिराने धावल्या.

हेही वाचा >>> फडणवीस यांची शिष्टाई; नाईक यांची नाराजी दूर

केवळ एकच विशेष गाडी…

मध्य रेल्वेने सोमवारी मुंबईतील टर्मिनसऐवजी पनवेलहून सावंतवाडीसाठी एकच विशेष रेल्वे गाडी सोडली. ही गाडी रत्नागिरीला रात्री १२ वाजता तर राजापुरात रात्री २ वाजता पोहोचेल. त्यामुळे पुढे गावापर्यंत प्रवास कसा करायचा, हा प्रश्न प्रवाशांना पडला.

एसटीने एक लाख मतदार रवाना

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारांतून कोकणात जाण्यासाठी विशेष बसदेखील चालवण्यात आल्या. रायगड, रत्नागिरी या भागात सर्वाधिक बस धावल्या. ५ मे रोजी २४४ नियमित बस चालवण्यात आल्या, तर आठ जादा बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे ४४,६०० प्रवाशांनी प्रवास केला. ६ मे रोजी २५० नियमित बस आणि आठ जादा बस सोडण्यात आल्या. त्यातून ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan passengers may miss voting due to mega block and constant delay of railway trains zws