ठाणे : उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या राजकीय चर्चा सुरु असतानाच सोमवारी ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत दीपोत्सव साजरा केला. या दीपोत्सवाचे आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. दिपोत्सवात मनसेच्या सहभागामुळे ठाण्यात राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

खड्डे, पाणी समस्या आणि ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि मनसेने नुकताच एक मोर्चा काढला होता. या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते सहभागी झाले होते. ठाण्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तव जात नसताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये मनोमिलन सुरु झाले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी-गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दिवाळीनिमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दीपोत्सव आयोजित केला होता.

या दीपोत्सवास आव्हाड यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि चारही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या दीपोत्सवानंतर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी महायुती सरकारवर आरोप केले. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करावा ही आमची निवडणूक आयोगा कडे प्रमुख मागणी आहे. मतदार यादीत चोरी केल्याशिवाय ते विधानसभा निवडणूक जिंकूच शकत नाहीत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. या महाराष्ट्रात दरोडा घातला आहे. त्या दरोडेखोरांना बाजूला कर आणि त्या विरोधात लढण्याची आम्हाला ताकद दे असे देवीला साकडे घातल्याचे आव्हाड म्हणाले. मतदार यादीत घोळ आहे. हा आरोप आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वीही केला होता आणि आता देखील आमचे तेच म्हणणे आहे. पारदर्शकपणे निवडणुका होण्यासाठी योग्य अशी मतदार यादी तयार करणे गरजेचे आहे असे आव्हाड यांनी सांगितले. तर लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली होती असा दावा विचारे यांनी केला. ठाणे जिल्ह्यात ज्या महापालिका त्यांच्या ताब्यात आहेत, तिकडे अनागोंदी कारभार सूरु आहे असेही आरोप विचारे यांनी केले.