शहापूर : आसनगाव येथे प्लास्टिकच्या वस्तू बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. कामगारांनी प्रसंगावधान दाखवित कंपनीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, आगीमुळे कंपनी जवळजवळ जळून खाक झाली असून कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
शहापुर नगरपंचायत, जिंदाल कंपनी, कल्याण डोंबिवली महापालिका आणि भिवंडी महापालिका येथील अग्निशमन दल तसेच स्थानिक १७ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कंपनीला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे शहापुर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.
दरम्यान भीषण आगीमुळे कंपनी जवळजवळ जळून खाक झाली असून कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे कळते आहे. आगीमुळे धुराचे लोट पसरल्याने स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी तात्काळ आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. विद्युत वितरण कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला होता.
ही कंपनी गेल्या अठरा वर्षांपासून असून येथे प्लास्टिकच्या वस्तू बनविल्या जातात. आग नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरु असल्याचे सांगण्यात येते.