ठाणे : ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण आणि भिवंडी शहरात घरफोडी करुन धुमाकूळ घालणाऱ्या शिकलकर टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ४० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह ३९ लाख ५३ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (२४), सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (२७), सन्नी करतासिंग सरदार (२७) आणि अतुल खंंडाळे (२४) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात बंद घरामध्ये प्रवेश करुन दागिने, रोकड चोरी झाल्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात उघडकीस आले होते. कल्याणमधील एका प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटकडून सुरु होता.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या विजयसिंग, सोनुसिंग, सन्नी आणि अतुल या चौघांना ताब्या घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. यातील विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल हे पुण्यातील हडपसर भागातील रहिवासी आहेत. तर सन्नी हा कल्याण येथील आंबिवली भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० गुन्ह्यांची उकल केली आहे. यामध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील डोबिवली, विष्णुनगर, नारपोली, मुंब्रा, कळवा, मानपाडा, कोळसेवाडी, मध्यवर्ती, शिवाजीनगर, बदलापूर, महात्मा फुले, विठ्ठलवाडी या पोलीस ठाणे हद्दीतील तसेच नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आणणे शक्य झाले. यातील विजयसिंग, सोनुसिंग आणि अतुल या तिघांविरोधात यापूर्वी देखील पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण २८ गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक २० गुन्हे हे एकट्या विजयसिंग याच्याविरोधात आहेत.

ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे, विनोद पाटील, अमंलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, आदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनावणे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, अमोल बोरकर यांच्या पथकाने केली.

काय आहे शिकलकर टोळी

– शिकलकर टोळीचा धूमाकूळ केवळ राज्यात नाही तर परराज्यात देखील आहे. ही टोळी पुण्यातून त्यांचे काम चालविते. या टोळीतील सदस्य इतके भयानक होते की हत्या करण्यापर्यंत यांची मजल गेली होती.