ठाणे : कळवा येथील खारभूमीवर असलेल्या मैदानाला काही दिवसांपूर्वी टाळे ठोकण्यात आले आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यानुसार या मैदानाला टाळे ठोकण्यात आल्याची चर्चा असताना, रविवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमादार जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत त्यांच्या आदेशाने या मैदानाला टाळे ठोकल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात काम करण्यासाठी खूप काही आहे, नको ती दादागिरी कशाला करता. टाळे लावायचे आहे तर, पुढे ७२ एकरवर झालेल्या अतिक्रमणावर लावा. उद्या मुलांना खेळण्यापासून रोखले तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, या उद्देशातून एका संस्थेने विकसित केलेल्या कळवा येथील खारभूमीवर मैदानाला जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी टाळे लावण्याची कारवाई केली. अचानकपणे झालेल्या या कारवाईवरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्यातील एका ‘दादा’ नेत्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा होती. तसेच मैदानातील सराव बंद झाल्याने खेळाडूंमधून नाराजी व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून रविवारी आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत लहान खेळाडू, त्यांचे पाल्य आणि प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले.

मैदानात लहान मुले दररोज खेळायला येतात. या मैदानातून अनेक खेळाडू घडले आहेत. मैदानात मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या मैदानात राजकीय हस्तक्षेप नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच ते सहा दिवसांपूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिसांना देवगिरी बंगल्यावर बोलावले होते. त्यांनी त्यांच्या भाषेत हे मैदान उघडे कसे ? अशी विचारणा करत मैदानाला ताबडतोब टाळे लावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर या मैदानाला जिल्हा प्रशानाने टाळे ठोकले असा आरोप आव्हाड यांनी केला.

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

कळव्यामध्ये मैदान शिल्लक नाही. हे मैदान वापरले नसते तर या मैदानावर झोपड्या उभ्या राहिल्या असत्या. ठाण्यातील कोर्ट नाका येथील सेंट्रल मैदानात अनेक मुले क्रिकेटचा सराव करतात. हे मैदान वायुदलाचे आहे. मैदान त्यांच्याकडून केव्हाही बंद करता येऊ शकते. परंतु त्यांनी मुलांना मैदानात खेळता यावे यासाठी ते बंद केले नाही. शिंदे यांच्या शिवसेनेने कळव्यातील याच मैदानावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर एका राजकीय पक्षाने याच मैदानावर ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांना कोणी अडविले नव्हते. माझ्याकडून कधीच राजकीय व्यासपीठ या मैदानावर उभारला नव्हता. असे असताना अजित पवार यांनी हा आदेश का दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच ज्या कोणाला आमदार बनायचे त्यांनी जरूर बना, परंतु आमदार बनताना या उन्मळणाऱ्या कळ्यांना कुस्करू नये असे आव्हाड म्हणाले. येथील मैदानात भिवंडी, ठाणे येथील मुले सरावासाठी येतात. महाराष्ट्रात काम करण्यासाठी खूप आहे, नको ती दादागिरी कशाला करता. टाळे लावयचे आहे तर, पुढे ७२ एकरवर झालेल्या अतिक्रमणावर लावा. लहान मुलांची मैदाने बंद करून तुम्ही मर्दुमकी गाजवत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – मीरा भाईंदरमधील भाजप-शिवसेना वाद शिगेला

आम्ही लवकरच एमसीएचा कॅम्प येथे आणणार होतो. त्याची बोलणी सुरू होती. परंतु त्यापूर्वी हे सर्व झाले. तुम्हाला मला निवडणुकीत पडायचं आहे, म्हणून हे सर्व सुरू आहे. पसंतु मैदान बंद करून तुम्ही कळव्यातील जनतेच्या मनातून उतरले आहात. उद्या आम्हाला खेळायला बंदी घातली तर आम्ही आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला.