ठाणे : गेल्या काही दिवसांपासून शिळफाटा, कल्याणफाटा, महापे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली. आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे, तर महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या ? कोंडी कमी करण्याच्यासाठी आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या. पाहिजे तर कोंडी कमी करण्याचे श्रेय तुमच्या पुत्राला घेऊ द्या..पण शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का पुसा, असा टोलाही त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिळफाटा, कल्याणफाटा भागात मोठ्याप्रमाणात गृहसंकुले उभी राहीली आहेत. तसेच येथील मार्गावरून बदलापूर, कल्याण, डोंबिवली भागातील हजारो वाहन चालक नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत असतात. उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतुकही या मार्गावरून होत असते. वाहनांचा भार वाढल्याने तसेच विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्याने दररोज वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच येथील एमआयडीसी मार्गावर ठाणे वाहतुक पोलिसांनी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे सायंकाळी कोंडी होत आहे. दररोजच्या कोंडीवरून मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे यांच्यावर टिका करत प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा… आता अंबरनाथमध्येही सिग्नल यंत्रणा, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर तीन ठिकाणी सिग्नल

हेही वाचा… ठाणे : दिवा स्थानकातून सीएसएमटी गाड्या सोडा, प्रवासी संघटनेची स्वाक्षरी मोहीम

‘शिळफाट्याच्या कोंडीने स्वत:चेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत. वाहतुक कोंडी सुटावी यासाठी नवनव्या ‘स्कीम’ घेऊन येतात. त्या ‘स्किम’ नसतातच. पाॅकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अशा चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर महिला, वृद्ध, रुग्ण सगळे तासन्-तास कोंडीला सामोरे जात आहेत. तेही आपल्या सुपूत्राच्या मतदार संघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या असा प्रश्न पाटील यांनी केला. कधीतरी आमच्या सूचनांचा विचार करा, कदाचित वाहतुक कोंडी कमी होईल. हवे तर याचे श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या. पण एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या कोंडीचा शिक्का तेवढा पुसा, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला. त्यामुळे शिळफाट्याच्या कोंडीचा मुद्दा आता तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla raju patil criticized cm and mp shrikant shinde over traffic jam at shilphata asj
First published on: 30-11-2023 at 18:09 IST