ठाणे - बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर ‘सुपारीबाज’ म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटल्याचे दिसले. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्या दरम्यान मनसैनिकांनी आंदोलन करत, ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणाचा, बांगड्यांचा मारा केला. भर रस्त्यात त्यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आले. यावेळी नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. हेही वाचा >>> Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकत म्हणाले… हा पूर्व नियोजित हल्ला असताना, पोलिसांना याबाबत माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्येकर्त्यांनी गर्दी केली होती. परंतू, बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील मनसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घालण्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाण्यात येताच, काही मनसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर शेण फेकले. तसेच पुढे त्यांचा ताफा आल्यानंतर ताफ्यावर नारळही फेकण्यात आले. हेही वाचा >>> मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी पाच ते सहा जण मोठ्या पिशवीतून नारळ भरुन घेऊन आले होते. भर रस्त्यात उद्धव यांच्या ताफ्यावर हे नारळ फेकले जात होते. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील वाहनातून प्रवास करत होते. त्यामुळे नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन मध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी नौपाडा पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.