Balyamama Mhatre / ठाणे : ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो मात्र वडपे ते खारेगाव हा टप्पा अनेक वर्षांपासून पूर्णच होत नाही, असे सांगत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केला. या रस्त्याचे काम माजी केंद्रीय मंंत्री कपिल पाटील यांच्या मुलाच्या मार्फत केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यातील बहुतांश काम निकृष्ट असून राज्य रस्ते विकास विकास महामंडळाकडून त्याच्यावर कारवाईस टाळाटाळ केली जाते, असाही आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मंडळाच्या एका अभियंत्याला निलंबीत केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील खारेगाव ते वडपे या टप्प्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता चिंचोळा होता. कुठे सहा मार्गिकांवर धावणारी वाहने अनेक ठिकाणी एकाच मार्गिकेवर येतात आणि त्यामुळे कोंडी होते. त्याचा फटका सर्वच वाहनांना बसतो. याच मुद्द्यावर भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संताप व्यक्त केला.
भिवंडीतील वाहतूक कोंडी समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे आजुबाजुचे रस्तेही पूर्ण होत नाहीत. सुमारे ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग ६ वर्षात पूर्ण होतो. पण फक्त खारेगाव ते वडपा हा २४ किलोमीटरचा टप्पा का पूर्ण होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या कामाबाबत संशय आल्याने ८ महिन्यांपूर्वी त्रयस्त संस्थेकडून संरचनात्मक लेखापरिक्षण करण्याची मागणी बाळ्यामामा म्हात्रे यांनी केली होती. त्याचे अहवालही आले आहेत. ज्या २१ टप्प्यांचे नमुने घेतले होते त्यापैकी १४ भाग निकृष्ट निघाले असल्याचा अहवाल आल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी बैठकीत मांडली. त्यानंतर त्यांनी एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना भेटलो असता त्यांनी कारवाईबाबत हास्यास्पद उत्तर दिले, असेही म्हात्रे यांनी सांगितले.
मिहान नावाच्या कंपनीचे काम. कपिल पाटील यांचा मुलगा देवेश पाटील करतात अशीही माहिती म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे या कंपनीच्या कंत्राटदारावर कारवाई होत नाही असा खळबळजनक दावा म्हात्रे यांनी केला. येथील अंडरपास अगदी निकृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला आहे. तो कोणत्याही क्षणी पडू शकतो. मात्र कंपनीला काळ्या यादीत का टाकत नाही, असा प्रश्नही म्हात्रे यांनी उपस्थित केला. त्यांना फक्त काळ्या यादीत नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
६६ टक्के रस्ता खराब
खारेगाव वडपे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्या लेखापरिक्षणाची मागणी केली होती. त्यातील काम पूर्ण झालेल्या ३६ हजार पॅनलपैकी २१ पॅनलची तपासणी करण्यात आली होती. तर त्यातील १४ पॅनले निकृष्ट दर्जाचे निघाले, अशी माहिती म्हात्रे यांनी सभागृहात दिली.
२१ पैकी जर १४ पॅनल निकृष्ट निघत असतील तर याचा अर्थ ६६ टक्के नमुने निकृष्ट आहेत. त्यामुळे या मार्गाच्या सर्वच भागाचे नमुने घेतले तर किती खराब निघतील याचा अंदाज लावावा, असेही म्हात्रे यावेळी म्हणाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार किसन कथोरे यांनीही या समस्येवर बोट ठेवले.
चौकशीचे संकेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येथील कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर काम करणाऱ्या एका अभियंत्याला याप्रकणात निलंबीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.