ठाणे : विधानसभा निवडणुकांपुर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीत कोपरी प्रभागातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विरोधात नगरसेवक पदाची निवडणुक लढून दाखवा आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणुक लढा, असे खुले आव्हान बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. तसेच आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी कुणीही अडविलेले नसल्यामुळे राजीनामा द्या, उगाच वायफळ बडबड करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा देऊन वरळीतून निवडणुक लढा, असे आव्हान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी दिले होते. त्यानंतर आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दुसरे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो, असे आव्हान आदित्य यांनी दिले आहे. त्यास आता बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बेकायदा बांधकामांच्या पाडकामाचे अहवाल देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश; अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईचा बडगा?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यावेळी त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देतो असे जाहीर केले होते. तरी सुद्धा दोन्ही वेळा अधिवेशनामध्ये ते भाषण करताना दिसून आले. यावरूनच यांची बडबड काय असते, हे दिसून येते. आता मुलगा आदित्यही तसाच बडबडतोय, अशी टिकाही म्हस्के यांनी केली. सचिन आहिर यांनी शिवसेना संपविण्याकरिता काम केले. कित्येकवेळा त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळून शिवसेनाविरोधात आंदोलने केली. हेच आहिर आदित्य यांच्यासमोर निवडणुकीत उभे राहू नयेत म्हणून आमदार सुनील शिंदे यांना घरी बसविले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश

किशोरी पेडणेकर यांनी आपल्याविरोधात जाऊ नये म्हणून त्यांना महापौर केले. अशाप्रकारे तीन जणांचा बळी देऊन आदित्य यांची आमदारकी शाबूत केली. शिवाय, आदित्य हे निवडूण येण्यासाठी आणखी काही तडजोडी केल्या, ती गुपिते वेगळीच आहेत, असा आरोपही म्हस्के यांनी केला. आदित्य हे वांद्रा मतदार संघाच्या क्षेत्रात राहतात. पण, हा मतदार संघ सोडून ते वरळी या सुरक्षित मतदार संघातून निवडणुक लढले आणि तिथे शिवसैनिकांनी केलेल्या कामाच्या जीवावर निवडुण आले. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या भागात राहतात, त्याच कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून निवडणुक लढून निवडुण येत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा निवडणुकांपुर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत कोपरी प्रभागातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विरोधात नगरसेवक पदाची निवडणुक लढून दाखवा आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणुक लढा, असे खुले आव्हान म्हस्के यांनी यावेळी आदित्य यांना दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mhaske open challenge to aditya thackeray for corporator election in thane zws
First published on: 07-02-2023 at 18:05 IST