scorecardresearch

डोंबिवलीत फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश

बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा भागातून या भागात व्यवसायासाठी येतात.

डोंबिवलीत फेरीवाल्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे आदेश
डोंबिवली पूर्वेत सोमवारी मानपाडा रस्त्यावर भरलेला फेरीवाल्यांचा बाजार.

डोंबिवली– डोंबिवली पूर्व भागात फ प्रभाग हद्दीत दिवसेंदिवस फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. नागरिकांना चालायला पदपथ रिकामे न ठेवता फेरीवाले व्यवसाय करत आहेत. या विषयाची गंभीर दखल घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी’ या बातमीचा संदर्भ देऊन डोंबिवलीचे परिमंडळ उपायुक्त, फ प्रभाग साहाय्यक आयुक्तांना अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना त्रास होत असताना फेरीवाले रस्त्यात बसतात कसे. कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामातील हा निष्काळजीपणा, कर्तव्यातील कसूरपणा योग्य नाही, असे सूचित करत यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करुन योग्य त्या कार्यवाहीचा अहवाल दाखल करण्याचे आदेश चितळे यांनी परिमंडळ उपायुक्त, फ प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची बालाजी ज्वेलर्सकडून फसवणूक ; दुकान बंद करुन मालक पसार

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला नाही. ह प्रभाग भागातील फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी एकही फेरीवाला दिसणार नाही याची काळजी घेतात. ग प्रभाग हद्दीत राजाजी रस्ता, रामनगर, केळकर रस्ता, उर्सेकरवाडी भागात फेरीवाले बसणार नाहीत यासाठी सतत कारवाई सुरू असते. परंतु, फ प्रभागातून फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

डोंबिवली पूर्वेतील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता, चिमणी गल्ली, मानपाडा रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर आणि पदपथांवर फेरीवाले बसत असल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड होते. फ प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल संध्याकाळी पुन्हा पथकाकडून सोडून दिला जातो. कारवाई झाली तरी साहित्य परत मिळत असल्याने फेरीवाले रस्त्यावर बसतात. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा भागातून या भागात व्यवसायासाठी येतात.

हेही वाचा >>> ठाणे : चिमुरडींवर वृद्धाकडून लैंगिक अत्याचार

सोमवारी डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांचा बेकायदा बाजार भरतो. रेल्वे स्थानक भागात कारवाई होते म्हणून सोमवारी फेरीवाले मानपाडा रस्त्यावरील पदपथावर संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. शिवसेना शाखा ते कस्तुरी संकुलाच्या दरम्यान हा बाजार भरतो. अतिरिक्त आयुक्तांनी फेरीवाले रस्त्यावर बसणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश देऊनही काल फेरीवाले मानपाडा रस्त्यावर बसले होते. या रस्त्याच्या एका बाजुला इमारत उभारणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांना चालायला जागा राहत नाही. फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसून येते. फ प्रभागातील एक कर्मचारी फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याने पूर्व भागातून फेरीवाले हटत नसल्याची चर्चा आहे.

परिमंडळ उपायुक्तांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त चितळे फ प्रभाग फेरीवाला हटाव पथकाविषयी काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:52 IST
ताज्या बातम्या