ठाणे : देशाचे लक्ष लागून असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या विमानतळाच्या नामकरणावरून वाद पेटला असतानाच, लोकार्पणाची तयारी देखील मोठ्याप्रमाणात होत आहे. या विमानतळाची पाहाणी नुकतीच उद्योजक गौतम अदानी यांनी केली. अदाणी नेमके कशासाठी आले होते. त्यांना कसाला आढावा घेतला पाहूया.

नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. हा प्रकल्प १,१६० हेक्टर क्षेत्र व्यापतो आणि पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२५ अखेर पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असून त्याद्वारे दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प २०३८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याचे सरकारचे नियोजन आहे.

विमानतळ प्रकल्पाचे महत्व विचारात घेता विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील स्थानिक क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली इत्यादी भागातील प्रवाशांना त्याचा मोठा दिसाला मिळणार आहे. त्यासाठी महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध भागांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाणार आहे.

नामकरणावरून वाद

विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी देखील केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अदाणींची पाहणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहाणी नुकतीच अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी केली. त्यांच्यासोबत इतर काही अधिकारी होते. अदाणी विमानातून विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. त्यावेळी त्यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतल्याचे कळते आहे. यापूर्वी देखील मार्च महिन्यात गौतम अदाणी यांनी विमानतळाची पाहाणी केली होती.

काय आहे प्रकल्प

२०१६ मध्ये नवी मुंबई विमानतळ विकसित करण्यासाठी सिडकोने जागतिक स्तरावर निविदा मागविली होती. या विमानतळाच्या विकासासाठीचा करार २५ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एमआयएएल) यांना देण्यात आला. यानंतर एमआयएएल आणि सिडको यांनी एकत्र येऊन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडची (एनएमआयएएल) स्थापना केली. या संस्थेमार्फत नवी मुंबईतील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे विकास, बांधकाम, संचालन आणि देखभाल यांची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने, डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. एनएमआयएएलमधील ७४ टक्के भांडवल एमआयएएलकडे असून उर्वरित २६ टक्के भांडवल सिडकोकडे आहे. एप्रिल २०२१ मध्ये अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले.