कल्याण – भिवंडी शहर परिसराची वाढती लोकसंख्या, या भागातील वस्तू साठा आणि दळवळण केंद्रातील (लाॅजिस्टिक पार्क) वाढती उलाढाल यांचा विचार करून ठाणे टपाल विभागाने भिवंडी जवळील भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्क येथे नवीन टपाल कार्यालय सुरू केले आहे. या भागातील कर्मचारी, कामगार यांना, या भागातील उद्योजक, व्यावसायिक यांना टपाल कार्यालयाच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे.
भूमी वर्ल्ड इंडस्टियल पार्कमधील नूतन टपाल कार्यालयाचे उद्घाटन टपाल विभागाचे महाराष्ट्र विभागाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. .यावेळी नवी मुंबई टपाल विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, नवी मुंबई विभागाचे संचालक अभिजीत इचके आणि ठाणे, भिवंडीील टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टपाल कार्यालयात केवळ आता टपाल सेवा नाहीतर बँकिंंग विषयक सुविधाही दिल्या जात आहेत. टपाल विभागाच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करू शकतात. उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर आणि सक्षम आहे. त्यामुळे ग्राहकांनी टपाल सेवेचा अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य टपाल मास्तर अमिताभ सिंग यांनी केले.
यावेळी ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला. ग्राहकांच्या टपाल सेवा, ग्राहक सेवेविषयीची मते टपाल अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अधिक प्रमाणात वस्तू साठा आणि वितरण केंद्र सुरू होत आहेत. हजारो कर्मचारी, कामगार याठिकाणी काम करतात. मुंंबई परिसरातील अनेक व्यावसायिक, उद्योजक भिवंडी परिसरातील वस्तू साठा आणि केंद्रात व्यवसायासाठी दाखल झाले आहेत. या साठा केंद्रांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी, कामगार हे आपल्या गावी दर महिन्याला मनिऑर्डर करत असतात.
त्यांना प्रत्येकवेळी भिवंडी शहरी भागात या कामासाठी जावे लागू नये. त्यांना स्थानिक पातळीवर ही सुविधा टपाल कार्यालयाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध असावी या विचारातून भिवंडीतील विस्तारित भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्कमध्ये नवीन टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला. तीस ते चाळीस वर्षापूर्वी भिवंडी शहरात हातमाग व्यवसाय जोरात होता. त्यावेळी या हातामागवर काम करणारा बहुतांशी वर्ग हा परप्रांतीय होता. दरमहा आपल्या मूळ गावी कुटुंबीयांना मनी ऑर्डर करण्यासाठी कामगारांच्या भिवंडीतील टपाल कार्यालयांमध्ये रांगा लागत होत्या. हे सर्व चित्र समोर ठेऊन टपाल विभागाने विस्तारित भिवंडी शहरात नवीन टपाल कार्यालय सुरू केले आहे.