डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील पलावा निळजे गाव हद्दीत मध्य रेल्वे प्रशासनाने निळजे रेल्वे स्थानकाजवळ ग्रामस्थांच्या सोयीचे रेल्वे फाटक बंद करून या भागात एक बोगदा बांधला आहे. हा बोगदा खोलगट भागात आणि नैसर्गिक प्रवाह असलेल्या भागात बांधण्यात आल्याने पावसामुळे या बोगद्यात पाणी तुंबण्यास सुरूवात झाली आहे. निळजे परिसरातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, पालक यांना बोगद्यातील दोन ते तीन फुटाच्या पाण्यातून दररोज जावे लागते.
पलावा वसाहतीजवळ निळजे गाव हद्दीतून दिवा-पनवेल रेल्वे मार्ग गेला आहे. निळजे गावातून पूर्व, पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटक होते. रेल्वे फाटकामुळे नोकरदार, शाळकरी मुले, नागरिकांना बाजारपेठ, शाळेत जाण्यासाठी सोयीचा रस्ता होता. या रस्त्याने रात्री उशिरापर्यंत नागरिक येजा करू शकत होते. या रेल्वे मार्गालगत दिल्ली ते जेएनपीटी (उरण) समर्पित जलदगती रेल्वे मार्गाची उभारणी सुरू आहे. या रेल्वे मार्गाच्या कामासाठी दोन वर्षापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न करता तडकाफडकी निळजे गावाजवळील रेल्वे फाटक बंद केले.
या बंद रेल्वे फाटकाखाली भुयारी मार्ग बांधून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने निळजे ग्रामस्थांना दिले होते. फाटक बंद केल्यानंतर रेल्वेने निळजे रेल्वे स्थानकाजवळ सखल भागात एक बोगदा बांधण्याची तयारी केली. आमच्या मागणीप्रमाणे जुन्या रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्ग बांधून द्या, अशी मागणी निळजेचे ग्रामस्थ प्रकाश पाटील आणि सहकाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याच्या भागातून नैसर्गिक पाण्याचे प्रवाह वाहतात. याठिकाणी बोगदा बांधला तर निळजे परिसरातील ग्रामस्थांना पावसाळ्यात या बोगद्यात पाणी तुंबणार असल्याने प्रवास करणे शक्य होणार नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली.
पाऊस सुरू झाला की या बोगद्यात दोन ते तीन फूट पाणी साचते. या तुंबलेल्या पाण्यातून बालवर्ग ते दहावीच्या मुलांना जावे लागते. बालकांना पालक खांद्यावर, कडेवर घेऊन बोगदा पार करतात. वाहनांची येजा या बोगद्यातून असते. प्रवाशांच्या अंगावर पाणी उडते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
पावसाळा सुरू झाल्याने निळजे रेल्वे स्थानकाजवळील बोगदा पाण्याने भरत आहे. मुसळधार पाऊस असला की कोणीही नागरिक या पाण्यातून जलचर किड्यांच्या भितीने जाण्यास तयार होत नाहीत. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून प्रवास करणे जिकरीचे असते. निळजे रेल्वे फाटक पुन्हा सुरू करा किंवा तेथे भुयारी मार्ग बांधून द्या या मागणीसाठी दोन वर्षापासून रेल्वेकडे पत्रव्यवहार करत आहे. त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
निळजे पूर्व, पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वेने रेल्वे फाटक बंद करून बांधलेला बोगदा पावसाळ्यात पाण्यान भरतो. प्रवासी, विद्याथ्यांचे हाल होतात. रेल्वेने फाटक सुरू करावे किंवा तेथे भुयारी मार्ग बांधून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. – प्रकाश पाटील, ग्रामस्थ, निळजे.