अंबरनाथ : अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पहिल्या दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सोमवार, १० नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवाी ११ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची संख्या शून्य असल्याची माहिती दोन्ही ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातील दोन्ही अ वर्ग नगरपालिका असलेल्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या निवडणुका ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्या. त्यापूर्वीपासून दोन्ही शहरांमध्ये सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी अद्याप आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनीही अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील संभाव्य उमेदवारांना प्रचाराला लागण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र तरीही यादी जाहीर होत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुकीचे वातावरण अद्याप शांत असून, प्रमुख पक्षांकडून उमेदवार जाहीर होताच नामनिर्देशन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.
युतीची शक्यता आणि बंडखोरांची भीती
अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून एकत्रित निवडणुका लढण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. दोन्ही पक्षांकडून सन्मानाची भाषा केली जाते आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाकडे स्थानिक पातळीवर उमेदवार प्रतिक्षेत आहेत. युती झाल्यास आणि अर्ज मागे घेण्याची वेळ आल्यास अडचण नको म्हणून अनेकांनी सबुरीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्याचवेळी यादी लवकर जाहीर केल्यास बंडखोरी होण्याची भीती वरिष्ठांना वाटते आहे. त्यामुळे यादी अखेरच्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतही तीन ते चार पक्ष एकत्र असल्याने उमेदवारांची यादी जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची चर्चा आहे.
चौकटः सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे. तर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे. तसेच त्याच दिवशी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. रविवारच्या दिवशी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता पाच दिवस उरले आहेत.
छाननी आणि अर्ज मागे घेणे
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
