Land Survey Office / डोंबिवली – डोंबिवली शहरातील नागरिकांचे जमीन मालकी हक्क नोंदीचे विषय एका फेरीत, एक खिडकी पध्दतीने मार्गी लागावेत म्हणून कल्याण येथील उप अधीक्षक, भूमि अभिलेख विभागाने डोंंबिवली येथील सुनील नगरमधील नगर भूमापन कार्यालयात सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून फेरफार अदालत शुक्रवारी आयोजित केली होती. यावेळी २० नागरिकांची अनेक वर्षाची जमीन मालकी हक्क नोंद, फेरफार नोंदीची प्रकरणे मार्गी लावण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत हा सेवा पंधरवडा राबविण्यात आला. भूमी अभिलेख कल्याण कार्यालयाचे उप अधीक्षक नितीन साळुंखे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. भूमी अभिलेख कल्याण या कार्यालयाचे उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री.नितीन साळुंखे यांच्या पुढाकारातून डोंबिवलीत फेरफार अदालतचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन साळुंखे आणि नगर भूमापन डोंबिवली विभागातील परिक्षण भूमापक यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या अदालतमध्ये एकूण 20 नागरिकांची डोंबिवली परिसरातील फेरफारा संदर्भातची प्रकरणे मार्गी लागली.
डोंबिवली नगर भूमापन परिक्षेत्रात डोंबिवली,ठाकुर्ली, चोळे, आयरे, शिवाजीनगर आणि परिसरातील मिळकत पत्रिकेवरील काही नागरिकांचे विविध प्रकारच्या फेरफार नोंदी विषयीचे अनेक प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबित होते. या नोंदीबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या. हे नागरिक नियमित भूमि अभिलेख, नगरभूमापन विभागात आपली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत होते.
कार्यालयात ही प्रकरणे घेऊन येणाऱ्या नागरिकांमध्ये वयोवृध्द, ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. त्यामुळे या नागरिकांना कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याचा त्रास होऊ नये म्हणून डोंबिवली शहरातील सुनीलनगर मधील नगरभूमापन कार्यालयात फेरफार अदालत घेण्यात आली. एकाच ठिकाणी एक खिडकी पध्दतीने ही फेरफार अदालत घेण्यात आली.
या अदालतमध्ये वीस नागरिकांची काही महिन्यांपासून रखडलेली मिळकत पत्रिकांवरील फेरफार नोंद, हक्कसोड दस्ताने,वारस,मानीव अभिहस्तांतरण, खरेदी दस्तऐवजाने फेरफार नोंद करणे, बोजा नोंद कमी करणे, धारणाधिकार बदल, दस्तऐवजावरील नावात बदल, मिळकतीवरील मयत व्यक्तिचे नाव कमी करणे अशी प्रकरणे मार्गी लावण्यात आली. एकाच व्यासपीठावर एकाच ठिकाणी धावपळ न करता फेरफार नोंदीचे काम झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
एकत्रित अशी काही प्रकरणे आल्यानंतर कल्याणची प्रकरणे कल्याण शहरात आणि डोंबिवलीतील प्रकरणे डोंबिवली शहरात मार्गी लावण्याचा यापुढे प्रयत्न असणार आहे. यापूर्वी काही महिन्यापूर्वी अशाच पध्दतीने फेरफार अदालत घेऊन नागरिकांची अनेक वर्षाची प्रकरणे मार्गी लावण्यात आली, असे उप अधीक्षक साळुंखे यांनी सांगितले.