ठाणे : ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ ते ९ ऑक्टोबर २०२५ या तीन वर्षांहून कमी कालावधीत ६ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक वाहने दुचाकींसह, रिक्षा, मालवाहू वाहनेही आहेत. मध्यवर्गीय नागरिक ठाण्यात अधिक प्रमाणात वास्तव्यास असल्याने दुचाकींचे प्रमाण अधिक असल्याचे वाहतुक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली भागात परिवहन सेवा पुरेशी नसल्याने बहुतांश नागरिक त्यांच्या खासगी वाहनाने किंवा रिक्षाने वाहतुक करतात. भिवंडी, नवी मुंबई, डोंबिवली आणि ठाणे शहरात गोदामे, कारखान्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे येथील कारखान्यांतून माल वाहतुकही मोठ्या प्रमाणात होत असते.
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि वाशी येथे प्रादेशिक परिवहन विभागाची कार्यालये आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत ठाणे, भिवंडी येथील वाहनांची नोंद होते. कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयात डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागातील आणि वाशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवी मुंबईतील वाहनांची नोंदणी होते. ठाणे जिल्ह्यात मागील तीन वर्षांहून कमी कालावधीत सहा लाख पाच हजार ३७७ वाहनांची नोंदणी झाली आहे. यापैकी बहुतांश वाहने ही दुचाकी, मोटार, प्रवासी रिक्षा, मालवाहतुक करणारी वाहने आणि कॅब या प्रकारातील आहेत.
पितृपक्षानंतर आणि दसऱ्याच्या कालावधीत वाहन खरेदीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी झाली आहे. आता वस्तू आणि सेवा कर कमी झाल्याने वाहन खरेदी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातील सहा लाख वाहनांपैकी एक लाखाहून अधिक वाहने ही वाणिज्य वापरातील आहे. या वाहनांची संख्या १ लाख १४० इतकी आहे. सर्वाधिक वाणिज्य वाहने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील आहेत. तर एक लाख १४० वाहनांपैकी २५ हजार १७० नव्याने नोंदणी केलेल्या रिक्षाचा सामावेश आहे. अनेकजण उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रिक्षा, कॅब चालक व्यवसायात उतरत असल्याने रिक्षाचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले जाते.
ठाणे जिल्ह्यात मध्यवर्गीय नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्यास येत आहे. तेथील नागरिकांकडून वाहतुकीचा पर्याय म्हणून खासगी वाहने, रिक्षा, कॅबचा अधिक वापर होतो. त्यामुळे येथे वाहनांची नोंदणी अधिक दिसून येते. – डाॅ. विश्वनाथ, वाहतुक तज्ज्ञ.
ठाणे शहरात लोकसंख्या वाढते. त्यानुसार वाहने खरेदी करण्याचे प्रमाणही तितकेच आहे असे परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वर्ष – वाहन नोंदणी
१ जानेवारी ते ९ ऑक्टोबर २०२५ – १,८७,४५३
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४- २,०९,९८१
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३- २,०७,९४३
एकूण – ६,०५,३७७