डोंबिवली – दिवाळीनिमित्त कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग झरे बांबर गावची महिला आपल्या मुलींच्याकडे कल्याण, डोंबिवलीत आली होती. डोंबिवलीतील मुलीची भेट घेतल्यानंतर या महिलेने कल्याण पूर्वेतील पिसवली येथे दुसऱ्या मुलीकडे रिक्षेतून जाण्याचा निर्णय घेतला. गळ्यातील सोन्याचा ऐवज तीने पिशवीत ठेवला होता. पिसवली येथे रिक्षेतून उतरल्यावर रिक्षा चालकाने भाडे घेतल्यानंतर महिलेच्या पिशव्या रिक्षेत असताना चालकाने पळ काढला. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल होताच, गु्न्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने टिटवाळा येथील रिक्षा चालकाला अटक केली.

बालिका बाळकृष्ण गवस (५६) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या दिवाळी सणानिमित्त कल्याणमधील पिसवली, डोंबिवलीततील स्टार काॅलनी येथील आपल्या मुलीकडे आल्या होत्या. डोंबिवलीतील मुलीची भेट घेतल्यानंतर बालिका गवस यांनी पिसवली येथे रिक्षेने जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षेतून जाताना कोणाची नजर पडू नये म्हणून महिलेने गळ्यातील साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे मंगळसूत्र जवळील पिशवीत काढून ठेवले.

स्टार काॅलनी येथे रिक्षेत बसून ही महिला पिसवली येथे गेली. सोबत दोन पिशव्या होत्या. एका पिशवीत सोन्याचा ऐवज आणि दुसऱ्या पिशवीत कपडे होते. रिक्षेतून उतरल्यावर महिलेने रिक्षा चालकाला भाडे दिले. भाडे घेतल्यानंतर बालिका गवस यांना रिक्षेतून पिशव्या उतरून घेण्याची कोणतीही संधी न देता रिक्षा चालक सुसाट वेगाने निघून गेला. या महिलेला नेण्यासाठी तिची पिसवली येथील मुलगी रिक्षा वाहनतळावर आली. बालिका यांनी घडला प्रसंग मुलीला सांगितला. बालिका यांचा जावई योगेश सावंत यांनी ही माहिती तात्काळ कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाला दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, स्वतंत्र तपास पथके तयार केली.

बालिका गवस डोंबिवलीत स्टार काॅलनी येथे ज्या ठिकाणी रिक्षेत बसल्या होत्या. तेथून ते पिसवलीपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यांना एका रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक मिळाला. त्या वाहन क्रमांकावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालक जयेश वसंत गौतम (३२) याला ताब्यात घेतले. ते टिटवाळा गणेशवाडी भागात राहतात.

रिक्षेत महिलेच्या पिशव्या असताना तू त्या उतरून न देता रिक्षा का सुसाट नेलीस यावर तो चालक निरूत्तर झाला. पोलिसांनी बालिका गवस यांच्या चोरीस गेलेल्या सोन्यासह त्याची रिक्षा जप्त केली आहे. २४ तासात पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली.

वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे, विनोद पाटील, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार गुरूनाथ जरग, विलास कडू, बालाजी शिंदे, सचिन भालेराव, आदिक जाधव, दीपक महाजन, उल्हास खंडारे, गोरखनाथ पोटे, गोरक्ष रोकडे, गणेश हरणे, सतिश सोनवणे, मंगल गावित, अमोल बोरकर, जालिंदर साळुंखे प्रवीण किनरे, विजय जिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

(सोन्याचा ऐवज चोरणारा रिक्षा चालक अटकेत)