ठाणे : बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी दोनशेहून अधिक जागांवर एनडीएने विजय मिळविला असून सर्वाधिक जागा भाजपाला मिळाल्या आहेत. या निकालानंतर सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून जल्लोष साजरा होत आहे तर, विरोधी पक्षाकडून आरोपांची मालिका सुरू झाली आहे. अशाचप्रकारे बिहार निवडणूक निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप केले होते. त्याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून जल्लोष साजरा होत आहे तर, विरोधी पक्षाकडून आरोपांची मालिका सुरू झाली आहे. अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप केले होते.

हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. ईव्हीएम व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला.

आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकी दरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की, असे रोहित पवार म्हणाले होते. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो, अशी टिकाही त्यांनी केली होती.

राहुल गांधींसारखी परिस्थिती

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टिकेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे. सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर टिका केली. पराभूत झाले हे मान्य करा. आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला कौल दिला, हे मान्य करा.

महाराष्ट्र असो किंवा बिहार असो येथे महायुतीच्या सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले, हे मान्य करा. किती दिवस असे आरोप-प्रत्यारोप करत राहणार आहात. आरोप केल्यानंतर राहुल गांधींची जी परिस्थिती बिहारमध्ये झाली, तीच परिस्थिती रोहित पवारांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होईल, अशी टीका सरनाईक यांनी केली.

केळकरांनी चमत्कार घडविला तर

महाराष्ट्रात महायुतीने २८८ पैकी २२७ जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली असून राज्यात महायुती अभेद्य आहे. वन मंत्री मिरा भाईंदरमध्ये जनता दरबार घेत आहेत, ते चांगले काम आहे. वनजमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत, असे तेथील जनतेचे काही प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांनी जनता दरबार घेणे गरजेचे आहे. पालघरमध्ये मी सुध्दा जनता दरबार घेतला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सुटत आहेत.

संजय केळकर हे ठाण्याचे आमदार आहेत, ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे ते निश्चितच महायुतीचे देखील दावेदार आहेत. ठाण्यातही महायुतीची सत्ता आहे आणि भविष्यातही महायुती होणार आहे. त्यामुळे केळकरांनी चमत्कार घडविला तर त्याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. आमची महायुती भक्कम आहे, असून महापालिका निवडणुकीतही ती भक्कम राहिल, असे सरनाईक म्हणाले.