उल्हासनगर: उल्हासनगरच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन गटांत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. कॅम्प क्र. ४ मधील मराठा विभागातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो व बॅनर काढून टाकल्याच्या प्रकारानंतर वातावरण चांगलेच तापले असून ठाकरे गटाने थेट पोलिस उपायुक्तांची भेट घेत यात हस्तक्षेपाचा मागणी केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याचे निवेदन सादर केले.

उल्हासनगर शहरात शिवसेनेची सुरुवातीपासून ताकद आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर शहरातील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा उल्हासनगर शहरातच झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने शिंदे सेनेत शिवसैनिकांनी प्रवेश केला. मात्र मराठी प्राबल्य असलेल्या उल्हासनगरच्या कॅम्प चार भागातील काही शिवसेनेचे शिलेदार शिंदेसेनेत गेले नाहीत. त्यामुळे येथील मराठा विभागातील शाखा ठाकरे गटाच्याच ताब्यात राहिली.

कॅम्प क्र. ४ मधील मराठा विभागातील ही मध्यवर्ती शाखा शिवसेनेच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक शेखर यादव आणि संगीता सपकाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शाखेचा ताबा घेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्रांसह शाखेवरील बॅनर फाडले, असा आरोप करण्यात आला आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. या संतप्त प्रतिक्रियांना अनुसरून बोडारे यांनी शाखेला भेट देऊन स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “कोणी गट सोडून गेलं, त्यांचा तो निर्णय आहे. पण बॅनर फाडणे, फोटो उतरवणे आणि शाखेचा अपमान करणे अमान्य आहे. यावर तातडीने कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” असे बोडारे यांनी सांगितले.

यानंतर उबाठा गटाने परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून, दोन्ही गटांतील संघर्ष उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.