कल्याण – डोंबिवलीतील काँग्रेसच्या निष्ठावान नेत्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात शालू नेसवून त्यांची बदनामी केली. यामुळे मानसिक धक्का बसलेले काँग्रेसचे डोंबिवलीतील पदाधिकारी मामा पगारे रुग्णालयात उपचार घेत आहेत. याची माहिती महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना समजल्यावर त्यांनी ही माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिली. त्यानंतर तात्काळ राहुल गांधी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मामा पगारे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. आणि ‘मामाजी डरो मत, अखिल भारतीय काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे,’ असे बोलून मामा पगारे यांना धीर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा समाज माध्यमांमध्ये प्रसारित केली म्हणून भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना भर रस्त्यात गाठून भरजरी शालू नेसवला आणि त्यांची समाजात बदनामी केली. या प्रकरणाची माहिती कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना दिली. हा सगळा प्रकार ऐकून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याप्रकरणात पूर्णपणे मामा पगारे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असलेले मामा पगारे यांच्या बरोबर भाजप पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत गैरवर्तन केल्याची माहिती काँग्रेस कार्यकारिणीत पोहचली आहे. कार्यकारिणीने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. थोरात यांनी ही माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिली. दिल्ली काँग्रेस वर्तुळात डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या एका निष्ठावान पदाधिकाऱ्या बरोबर गैरवर्तन केल्याची चर्चा सुरू आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिली.

राहुल गांधी यांनी आपल्याशी मोबाईल फोनवरून संपर्क साधला, असल्याची माहिती मामा यांनी माध्यमांना दिली. राहुल गांधींनी आपण अजिबात कोणाला घाबरू नका. याप्रकरणी आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करू. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा धीर दिला आहे, असे मामा पगारे यांनी सांगितले. मामा पगारे यांची समाजात मानहानी, बदनामी केल्याबद्दल मामांच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करून घेतले आहेत. पण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस तयार होत नाहीत. कारण राज्यात त्यांचे सरकार आहे. गृहविभाग त्यांचा आहे, असे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले. मामा पगारे प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही पोलीस उपायुक्तांना पत्र देणार आहोत. याप्रकरणी आमच्या मागणीप्रमाणे गुन्हा दाखल केला नाहीतर आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष पोटे यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ, बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांनी आपल्याशी संपर्क करून आरोग्याची काळजी घेण्याचे, काँग्रेस पक्ष पाठीशी आहे, असे आश्वासन दिले आहे, असे मामा पगारे यांनी सांगितले.