डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार वरील रखडलेल्या सरकत्या जिन्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम रखडल्याने फलाटावरील प्रवाशांना वळसा घेऊन जिन्यावर जावे लागत होते. तसेच या कामामुळे फलाटाचा भाग अरूंद झाला होता. फलाटावर वावर करणे प्रवाशांना मुश्किल झाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे स्थानकावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकाला जोडणारा पादचारी पूल फलाटाच्या मध्यभागी सुरू केला आहे. या सुविधा सुरू असताना डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण बाजूकडे मागील सहा महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने या भागात प्रवाशांना उतरण्यासाठी असलेला जिना तोडून टाकला होता. त्या जागी सरकत्या जिन्याच्या कामासाठी खड्डा आणि फलाटावर त्या कामाच्या ठिकाणी चारही बाजुने संरक्षित पत्रे लावले होते. हे काम लवकरच पूर्ण होईल अशी रेल्वे प्रवाशांना अपेक्षा होती.
फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेने उतरण्यासाठी जिना नसल्याने प्रवाशांना दक्षिण बाजूच्या जिन्याने जाऊन पुन्हा माघारी येऊन फलाटावर कल्याण दिशेकडे जावे लागत होते. हा वळसा घेताना प्रवाशांची दमछाक होत होती. फलाट क्रमांक तीन आणि चारवर मुंबईला जाणाऱ्या आणि कर्जत, कसारा, अंबरनाथ, खोपोलीकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. या दोन्ही बाजूकडील लोकल एकावेळी फलाटावर आल्या की कल्याण बाजूकडील भागात गर्दी होत होती. प्रवाशांमध्ये रेटारेटी होत होती.कल्याण दिशेने उतरलेला प्रवासी फलाटावर दक्षिण दिशेने चालत जाऊन तेथून जिन्यावर जात होता.
दक्षिण दिशेने जाताना प्रवाशांना सरकत्या जिन्याच्या रखडलेल्या कामाचा मोठा फटका बसत होता. या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना धक्काबुक्के खात फलाटावर वावरावे लागत होते. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत होती. उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी रेल्वेच्या स्थानिक आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क करून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील सरकत्या जिन्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे वेळोवेळी सुचविले होते. या कामासाठी मध्य रेल्वेकडून ब्लाॅक मिळत नसल्याने या कामाचे साहित्य डोंबिवली पूर्व भागातून फलाटावर आणणे शक्य होत नव्हते, अशी माहिती नंतर उघड झाली होती. लोकसत्ताने या महत्वपूर्ण विषयाचा पाठपुरावा केला होता.अखेर रेल्वेने प्रवाशांच्या सूचनांची गंभीर दखल घेत पावसाळ्यापूर्वी फलाट क्रमांक तीन आणि चारवरील सरकत्या जिन्याचे काम सुरू केले आहे. मे महिना अखेरपर्यंत हा जिना प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता अधिकाऱ्याने वर्तवली.