कल्याण – शिंदे शिवसेनेतून महेश पाटील भाजपमध्ये का केले, हा प्रश्नच नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पक्ष सोडल्यानंतर कोणी नेत्यांवर आरोप करू नयेत. पाटील तिकडे गेलेत तेथे त्यांनी सुखाने राहावे, असा उपरोधिक टोला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मंगळवारी शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेल्या महेश पाटील यांना लगावला.

कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल. कल्याण डोंबिवली शहरांमध्ये शिवसेनेचे ताकद आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील. पालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती आहे. त्यामुळे पालिकेवर कोणाचा महापौर बसवायचा याचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ घेतील, असे आमदार मोरे यांनी सांगितले.

मंगळवारी सकाळपासून भाजपने डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचे म्होरके नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेण्यास सुरूवात करताच शिंदे शिवसेनेत काही वेळ अस्वस्थता पसरली. त्यानंतर शिवसेनेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांना शिवसेना मध्यवर्ति शाखेवर जमा होण्याचे आदेश देण्यात आले. याठिकाणी मोजके पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाली. या बैठकीनंंतर आमदार राजेश मोरे माध्यमांशी बोलत होते.

पक्ष सोडल्यानंतर आरोप प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. पक्ष फोडाफोडीचे राजकारण प्रथम त्या पक्षाने सुरू केले. आम्ही नाही, असे आमदार मोरे यांनी स्पष्ट केले. आपण महायुतीत आहोत. एकजुटीने काम करत आहोत. याचे भान ठेऊन एक क्रमांक असलेल्या पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करू नये, असा सल्ला आमदार मोरे यांनी दिला.

गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत शिंदे शिवसेनेने कल्याण डोंबिवली शहर परिसरात नेहमीच आपला वरचष्मा राहील. मित्र पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान मिळेल अशी कृती केली होती. अशा परिस्थितीत शिंदे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आता नरमाईची भूमिका घेत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.